‘नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार?’ | पुढारी

'नगर-मनमाड महामार्ग आणखी किती बळी घेणार?'

राहुरी/शिर्डी; पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड महामार्ग वरील प्रवास म्हणजे अपघाताला आमंत्रण. अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राहुरी ते नगर हा तासाभराचा प्रवास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तब्बल दोन तासांचा झाला आहे. खड्डे चुकवावे की, समोरच्या वाहनाला चुकवावे, अशी दुहेरी अवस्था वाहनचालकांची झाली आहे. नगर-मनमाड महामार्ग वरील रस्त्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रस्त्याचे काम होणार की नाही?. गेल्या पंधरवड्यामध्ये १० ते १२ जणांच्या अपघाताच्या घटना घडल्या. यामध्ये ५ जणांचा बळी गेला आहे. महामार्ग आणखी किती बळी घेणार? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे

एकीकडे रस्त्याला ५०० कोटी रुपये मंजुरीची घोषणा करण्यात आली. दुसरीकडे मातीयुक्त मुरूम टाकून भर टाकण्यात आला. पूर्वीच खराब झालेल्या रस्त्याची अजून दुरावस्था करण्याचा हा प्रकार होत आहे.

नगर जिल्ह्यातील दळण वळणाचा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला नगर-मनमाड राज्यमार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या साम्राज्यात विस्कळीत झालेला आहे. अत्यंत दयनीय अवस्थेत रस्त्यावरून खड्डे चुकविताना नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.  रस्त्यावर दैनंदिन अपघात घडतच आहेत.हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

मागील वर्षी या रस्त्यासाठी ५०० कोटी मंजूर झाल्याची घोषणा झाली होती. तसेच एप्रिल २०२१ मध्ये काम सुरू होईल. असे आश्वासन दिले गेले होते. तसे काही घडताना दिसत नाही. त्या उलट रस्त्यावर खड्डे पडलेले असताना बांधकाम विभागाकडून रस्त्यावर मातीयुक्त मुरूम टाकण्यात आला.

खड्ड्यांमध्ये चाके रुतत असल्याने एकीकडे वाहनांचे मोठे नुकसान आहे. तर अनेक प्रवाशांना शरीरदुखीचे आजार मोफत घ्यावे लागत आहे. या रस्त्याबाबत केवळ घोषणाबाजी होण्यापेक्षा प्रत्यक्ष रस्त्याचे काम होणे गरजेचे बनले आहे.

दरम्यान, या महामार्गाची, तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यासाठी राहुरी फॅक्टरी व राहुरी येथील युवकांनी रस्ता दुरुस्ती कृती समिती स्थापन केलीय. त्यांनी खड्ड्यात गाडून घेण्याचा इशारा दिला आहे. तर राहुरी येथे गणेश पवार या युवकाने खड्ड्यातच उतरून निषेध केला आहे. त्याने हातात फलक घेऊन संबंधितांचे लक्ष वेधले.

नगरपासून कोल्हारपर्यंत नगर-मनमाड महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. दरदिवशी अपघातात अनेक प्रवासी व वाहनचालक जखमी होत आहेत. पावसामुळे हा महामार्ग खड्ड्यात गेला आहे.

याबाबत संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे. अन्य़था नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होण्याच्या मार्गावर आहे.

‘त्या’ दहा कोटींची चर्चा?

या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून गाजत आहेत. मागील वर्षीही रस्त्याचा प्रश्न अधांतरी आहे.

१० कोटी रुपयांची उपलब्धता झाल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.

काही महिन्यांतच रस्त्यावर टाकलेल्या मातीयुक्त खडीमुळे पुन्हा रस्त्याची चाळण झालेली आहे.

त्यामुळे तो १० कोटी रुपयांचा निधी गेला कोठे गेला? निकृष्ट काम करून शासकीय निधी लाटणार्‍या विरोधात गुन्हे दाखल होणार का?, असा प्रश्न विचारला जात आहे.

खड्डेमय रस्त्यामुळे भाविकांत संताप

पिंपरी निर्मळ ते निघोज बायपास हा कोरोना लॉकडॉउनपूर्वी करण्यात आला होता.

हा रस्ता निर्मळ पिंपरी ते निघोजपर्यंत होता. त्यामुळे शिर्डीच्या मुख्य रस्ता हा व्यवस्थित होता.

तो बायपास इतका खराब झाला की, त्या रस्त्यावरील वाहतूक मुख्य हायवेवरून पोलिसांनी सुरू केली.

मात्र जड वाहतुकीनंतर आणि पहिल्या पावसाने हा रस्ता खराब झाला आहे.

या रस्त्याच्या डागडुजीसाठी ४० कोटी निधी आणला होता. त्यामध्ये या रस्त्यावरील पिंपरीच्या मुख्य चौकात, अस्तगाव माथा, राहत्यातील सेंट जॉन स्कूल जवळ, मस्जिदजवळ, सिद्ध संकल्प लॉन्स, कृषी उत्पन्न बाजार समिती, साकुरी शिव, साई आश्रम भक्त निवास येथे नेहमीचं वाहनांची गर्दी होतेय.

५०० खोल्या समोर, लक्ष्मी नगरच्या ओढा, पोलिस विश्रामगृह, निमगाव बायपास, सावळीविहिर ते कोपरगावपर्यंत मोठे खड्डे पडले आहेत. येथेही खूप वाहने अकडून पडतात.

या रस्त्यांचे डागडुजीचे काम करण्यात आले. आता थोड्याच दिवसांपूर्वी या ठिकाणावरील खड्डे बुजविण्यात आले होते.

परंतु, पुन्हा दोन दिवसांच्या पावसाने खड्ड्यात रस्ता हरवला आहे.

हा रस्ता लवकरच नॅशनल हायवे ऑथोरिटी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असल्याची चर्चा आहे.

मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोणत्याही अधिकार्‍याने दुजोरा दिला नाही. तर या रस्त्याच्या कामासाठी ५०० कोटींचा निधीही मंजूर असल्याची चर्चा आहे. मात्र हे काम कधी सुरू होणार याची जनसामान्य वाट पाहत आहे.

हा रस्ता साईबाबांच्या नगरीतून जाणारा रस्ता आहे. येथे देशभरातून भाविक येतात. या रस्त्याला राज्य सरकार आणि केंद्र शासनाने प्राथमिकता द्यावी. या रस्त्याचे काम सुरू करावे. अशी मागणी नागरिक करीत आहेत.

हेही वाचलं का? 

पाहा व्हिडिओ- इतक्या प्रकारचे शाईचे दौत कधी पाहिलेत का? |

Back to top button