चंद्रपूर : दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू; पाच महिन्यात सात वाघांचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू; पाच महिन्यात सात वाघांचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र वाघांच्या अधिवासाला पुरेसे नसल्याने वाघांमध्ये झुंजी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन वाघांमध्ये झुंज होवून एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१३) सकाळी उघडकीस आली आहे. पाच महिन्यांत आतपर्यंत सात वाघांचा मृत्यू झाल्याची बाब वन विभागाची चिंता वाढविणारी आहे.

बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा बल्हारशाह जंगल सफारी मध्ये आज सोमवारी (दि.१३) येथील वन कर्मचारी गस्त करीत असताना सकाळी साडे नऊच्या सुमारास सफारी मधील कक्ष क्रं.५१० नियतक्षेत्र किन्ही येथे एका अडीच वर्षीय नर वाघाचा मृतदेह आढळून आला. दोन वाघाच्या झुंजीत या नर वाघाचा मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मौका स्थळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर व राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरण प्रतिनिधी बंडु धोत्रे दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून मृत वाघाचे शव शवविच्छेदनासाठी वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर येथे नेण्यात आले.

मृत वाघांचे शवविच्छेदन डॉ. कुंदन पोडचलवार, पशुवैद्यकीय अधिकारी, TTC चंद्रपुर व डॉ. आनंद नेवारे, पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपुर यांनी केले. या प्रकरणात पुढील तपासासाठी मृत वाघाचे सिलबंद नमुने घेण्यात आले असून ते रासायनिक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळा येथे पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्रीमती स्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश रामचंद्र भोवरे करत आहेत.

पाच महिन्यांत सात वाघांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यात सतत वाघांचे मृत्यू होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. त्यांच्या अधिवासाला चंद्रपूर जिल्ह्यातील वनक्षेत्र हे पुरेसे नसल्याने वाघांच्या झुंजी वाढलेल्या आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जानेवारी ते मे 2024 या पाच महिन्यांत तब्बल सात वाघांचा मृत्यू झाला आहे. आजचा हा 7 वा मृत्यू आहे. यापूर्वी 15 जानेवारी बोर्डा वनक्षेत्रात, 18 जानेवारीला भद्रावती येथे, 22 जानेवारी कोळसा जंगलात 2 वाघांचा मृत्यू, सावली येथे 27 फेब्रुवारी, बल्लारपूर कळमना 8 मे, 13 मे रोजी बल्लारपुर कारवा जंगल क्षेत्रात वाघाच्या मृत्यूची घटना घडली आहे. या सर्व घटनांचे कारण वाघाची झुंज असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

Back to top button