..मग आमदार का बनू शकला नाही? : शंभूराज देसाई - पुढारी

..मग आमदार का बनू शकला नाही? : शंभूराज देसाई

सणबूर; पुढारी वृत्तसेवा

सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्री पदाची भीती का वाटते मला माहीत नाही. मात्र, मला मंत्रिपद मेहरबानी वर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह आपल्यावर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहरबानी आहे, त्या मेहरबानीवर आपण आमदार का बनू शकला नाही? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला घरी बसवले आहे, याचे भान राखावे,असे प्रतिउत्तर गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. दौलतनगर ता. पाटण येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालक पद घेऊनही केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नुकसान केले आणि आता घराणे शाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे. त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही. मंत्री पद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम, कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणार्‍यांना काय समजणार?

राज्यातील आघाडी सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार आहे, हे एका पक्षाचे सरकार नाही याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत. आणि मगच कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रिपदे मिळाली असली बेताल वक्तव्ये करावीत. जिल्हा बँकेची केवळ 102 मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. अजून बर्‍याच निवडणुका व्हायच्या आहेत.

तालुक्यातील निवडणुका आमच्यासाठी काही नविन नाहीत. आम्हीही या निवडणुकांमध्ये तुमच्याशी दोन हात करायला माझ्या कार्यकर्त्यांसह तयार आहोत. पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाची निष्ठा सोयीनुसार गुंडळून ठेवणार्‍यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकविण्याची गरज नाही. तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये आतापर्यंत तुम्ही कोणा-कोणाला खुणावले हे ही तालुक्याने पाहिले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button