सातारा : सातार्‍यात दिग्गजांचे पानिपत; शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत | पुढारी

सातारा : सातार्‍यात दिग्गजांचे पानिपत; शंभूराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत

“सातारा : पुढारी वृत्तसेवा” image=”http://”][/author]

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते आ. शशिकांत शिंदे या दिग्गजांचे पानिपत झाले. जिल्हा मध्यवर्ती बँक राष्ट्रवादीच्याच ताब्यात राहिली असली तरी माण, कोरेगाव, खटाव, जावली या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार पराभूत होऊन बंडखोरांची व विरोधकांची सरशी झाली आहे. माणमधून शेखर गोरे, खटावमधून प्रभाकर घार्गे, कोरेगावमधून सुनील खत्री, तर जावलीतून ज्ञानदेव रांजणे विजयी झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उदयसिंह विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला.

जावली सोसायटी मतदारसंघात आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक व राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली. केवळ एका मताने शिंदे पराभूत झाले.

कराड सोसायटी मतदारसंघात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 मते मिळाली, तर माजी सहकारमंत्री स्व. विलासराव
उंडाळकर-पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह उंडाळकर-पाटील यांना 66 मते मिळाली. पाटण सोसायटी मतदारसंघात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा धक्कादायकरीत्या पराभव झाला आहे.

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजितसिंह पाटणकर यांनी ना. देसाई यांचा 14 मतांनी पराभव केला. पाटणकर यांना 58, तर ना. देसाई यांना 44 मते मिळाली. कोरेगाव सोसायटी मतदारसंघात सहकार पॅनेलचे शिवाजीराव महाडिक व आ. महेश शिंदे समर्थक सुनील खत्री यांना प्रत्येकी 45 मते पडली. त्यानंतर चिठ्ठीद्वारे सुनील खत्री यांचा विजय झाला. खटाव सोसायटी मतदारसंघात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार नंदकुमार मोरे यांचा 10 मतांनी पराभव केला.

घार्गे यांना 56, तर मोरे यांना 46 मते मिळाली. माण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे शेखर गोरे व मनोज पोळ यांच्यात चुरस होती. शेखर गोरे व मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते पडली. चिठ्ठीद्वारे निकालात शेखर गोरे हे विजयी झाले. नागरी सहकारी बँका आणि पतसंस्था मतदारसंघात सहकार पॅनेलचे रामभाऊ लेंभे यांनी एकतर्फी विजय मिळवला

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप विधाते यांनी शिवसेना नेते शेखर गोरे यांचा पराभव केला. महिला प्रतिनिधी राखीव मतदारसंघात सत्ताधारी सहकार पॅनेलच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे यांनी शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर यांचा पराभव केला.

Back to top button