तडका : डिपॉझिट जप्तची नामुष्की | पुढारी

तडका : डिपॉझिट जप्तची नामुष्की

राज्यात आणि एकंदरीतच देशात निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. आपल्याच पक्षाच्या जास्त जागा येणार आहेत, हे छातीठोकपणे सांगितले जात आहे. उमेदवारांच्या प्रचारातही प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन केले जात आहे. विरुद्ध पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होणार आहे, असे तार स्वरात सांगितले जात आहे. पराभूत होणे वेगळे आणि त्यापेक्षा डिपॉझिट जप्त होणे हे जरा जास्तच नामुष्कीचे असते. याचा अर्थ एवढच होतो की, तुम्ही ही निवडणूक लढवायला नको होती, तरी पण ती हट्ट करीत लढवली; मग डिपॉझिटवर पाणी सोडा आणि पराभव मान्य करा, असा याचा अर्थ होतो.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे डिपॉझिट असते तरी किती? तर लक्षात घ्या की, सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपये आणि एससी-एसटी या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार पाचशे रुपये डिपॉझिट म्हणून जमा करावे लागतात. निवडणुकीसाठी उभा राहणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे एक गणित असते. आपल्या जातीतील मते, आपल्याला मदत करणार्‍या आमदारांनी आणून दिलेली मते, राष्ट्रीय पातळीवरील पक्ष असेल तर वरिष्ठ नेत्याच्या नावावर मिळालेली मते, असे करून आपण निवडून कसे येणार, हे तो स्वतःलाच समजावत असतो.

गत निवडणुकीचा आढावा घेतला, तर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण 867 पैकी 768 उमेदवारांना डिपॉझिट गमवावे लागले होते. किती मते पडली म्हणजे डिपॉझिट वाचते, हे पण समजून घ्या. एकूण वैध मतांपैकी 16.66 टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याचे डिपॉझिट जप्त केले जाते. याचा अर्थ एवढाच की, डिपॉझिटसाठी भरलेली 25,000 किंवा साडेबारा हजार जी काय रक्कम असेल ती परत केली जात नाही; परंतु 16.66 टक्के मते मिळाली तर डिपॉझिट परत दिले जाते.

संबंधित बातम्या

डिपॉझिट हे अर्ज भरतानाच जमा करावे लागते आणि समजा, अर्ज परत घेण्याच्या मुदतीत कोणा उमेदवाराने अर्ज परत घेतला, तर त्याचे डिपॉझिट त्याला परत दिले जाते. लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणे म्हणजे दणदणीत विजय आणि डिपॉझिट जप्त होणे म्हणजे दारुण पराभव हे ठरलेले आहे. 25,000 ही रक्कम काही फारशी मोठी नाही. कोणीही अपक्षही सहज एवढी रक्कम भरून लोकसभेला उभे राहू शकतो आणि प्रचार वगैरेवर काही खर्च न करता देशाच्या तिजोरीवर भार टाकू शकतो. जेवढे जास्त उमेदवार, तेवढी जास्त मतदान यंत्रे लागतात, तेवढी जास्त यंत्रणा कामाला लागते. कुणीही सोम्या गोम्याने यावे आणि केवळ 25,000 भरून रिंगणामध्ये प्रवेश करावा या प्रकाराला कुठे तरी आळा घातला पाहिजे, असे वाटते. हे डिपॉझिट वीस-पंचवीस लाखही करता आले असते; परंतु त्यामुळे सामान्य उमेदवाराला निवडणूकच लढवता येणार नाही म्हणून बहुधा ते कमी ठेवले असावे.

भर डिपॉझिट, राहा निवडणुकीला उभा आणि पड आडवा, हेच बर्‍याच उमेदवारांचे धोरण असते. यथावकाश निवडणुका झाल्यानंतर हे लोक पडतात; पण तरीही त्यांनी आपल्या लोकशाहीला प्रगल्भ वगैरे केलेले असते. अमेरिका आणि तत्सम विकसित देशांत एका मतदारसंघात जेमतेम चार-पाच उमेदवार असतात. तिकडे राजकारण गांभीर्याने केले जाते. आपल्याकडे वार्डामध्ये डिपॉझिट जप्त झालेला उत्साही उमेदवार थेट लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहून संसदेचे दरवाजे ठोठावण्याची भाषा करतो.

Back to top button