सातारा : विद्यार्थी, व्यावसायिकांचे नुकसान | पुढारी

सातारा : विद्यार्थी, व्यावसायिकांचे नुकसान

कराड; प्रतिभा राजे

कोरोना महामारीमुळे गतवर्षी मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काही महिन्यांपूर्वीच एसटी सुरू केली. मात्र राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी मागील सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे एसटी बंद झाली आहे. यामध्ये कराड आगाराचे कर्मचारीही सहभागी असल्याने दररोज 8 ते 9 लाख उत्पन्न मिळवणार्‍या कराड आगाराचे गेल्या 22 दिवसांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बस बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रिद वाक्य घेवून धावणारी लालपरी सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याची आहे. मात्र राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनास राज्यभरातील डेपोमधून पाठिंबा देण्यात आला. काम बंद आंदोलनात कराड आगारातील चालक, वाहक, डेपोतील अधिकारी, क्लार्क यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे बसस्थानकामधून एकही बस बाहेर येत नाही. त्यामुळे महामंडळाचे नुकसान झाले आहेच; परंतु प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

कराड बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने याठिकाणी कराड तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच वडूज, दहिवडी, पुसेसावळी अशा अन्य तालुक्यातून प्रवाशी,विद्यार्थी येत असतात. त्यामुळे बसस्थानक नेहमी गजबजलेले असते. दिवाळी सणासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी असणारे कर्मचारी आपल्या गावी येतात. त्यामुळे कराड आगाराचे महिन्याचे उत्पन्न 8 ते 9 लाख रुपये आहे. गेल्या 22 दिवसांपासून एसटी बंद असल्याने कोट्यवधीचा तोटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.

सणानिमित्त आगाराचे उत्पन्न जादा होत असते. दिवाळी संपली की पुन्हा गावाकडे प्रवासी जात असतात. भाऊबीज संपली की मुंबई व पुणेकडे जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मात्र भाऊबीजनंतर बस बंद असल्याने आगाराला या दिवसांत मिळणारे जादा उत्पन्न गमवावे लागले आहे, तर प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागली.

नुकतीच शाळा सुरू झाली अन्…

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. गेल्या महिन्यापासून ग्रामीण भागात 5 वी पासून तर शहरी भागात 7 वी पासून शाळा सुरू केल्या आहेत. कराड शहरामध्ये ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना एसटी बंद असल्याने शाळेत जाणे अवघड झाले आहे. काही विद्यार्थ्यांनी शाळा सुरू झाल्यावर बसचा पासही काढला मात्र तोपर्यंत बसेस बंद झाल्या. खासगी वाहनाने शाळेत जाणे आर्थिक दृष्ट्या न परवडणार्‍या विद्यार्थ्यांना घरी बसावे लागले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या आनंदावर एसटीमुळे विरजण पडले असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यार्ंंनी व्यक्त केल्या आहेत.

छोट्या व्यावसायिकांनाही फटका

तालुक्यातील ग्रामीण भागातून कराडमध्ये व्यवसायासाठी येणार्‍या छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दररोज सकाळी नेहमीच्या बसने कराड शहरात विक्रीसाठी माल घेवून येणार्‍या व्यावसायिकांची बस बंद मुळे मोठी अडचण झाली आहे. दुचाकी किंवा अन्य वाहन नसल्याने या व्यावसायिकांना खासगी वाहनात जादा दर देवून कराडला यावे लागत आहे. खासगी वाहनांनीही संधीचा फायदा घेत नेहमीपेक्षा दर वाढवले आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही दवाखान्यात किंवा अन्य कामासाठी कराडमध्ये हाफ तिकिटाऐवजी फुल्ल दर देवून प्रवास करावा लागत आहे.

सरकारने मागण्या मान्य कराव्यात

आंदोलनामुळे आमचेही हाल होत आहेत. पगार नाही त्यामुळे या महिन्याचा खर्च कसा भागवावा याचे कोडे आम्हाला पडले आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्हालाही प्रवाशांचे हाल बघवत नाहीत; पण सरकार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहात आहेत. लवचिकता दाखवणे गरजेचे आहे. अनेक वर्षापासून आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आम्हाला हा मार्ग स्वीकारावा लागला आहे. मागण्या मान्य झाल्या तर आम्हीही कामावर त्याच दिवशी हजर राहू, अशा प्रतिक्रिया एसटी अधिकारी, कर्मचार्‍यांनी दिल्या आहेत.

Back to top button