सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी | पुढारी

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा

राज्यात एका विशिष्ट घटकांना पुढे घेऊन चाललो आहोत. त्यामुळे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवायच्या की महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायच्या, याबाबत विविध घटकांशी चर्चा करणार आहोत. एकत्रीकरणाबाबतच्या स्थितीचा अभ्यास करून धोरण ठरवू, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी महाबळेश्वर येथे पत्रकार परिषदेत दिली. एकप्रकारे त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संकेत दिले.

तसेच एस. टी. कर्मचार्‍यांचा प्रश्न लवकरच सुटेल, असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेची
निवडणूक सिरिअसली (गांभीर्याने) लढायला पाहिजे होती, अशा शब्दात पवारांनी शिंदे यांच्या पराभवाचे विश्लेषण केले. त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचे धोरण ठरवताना सातारा बँकेत यांनी काय केले? याचा मला उपयोग होईल, असा टोलाही पवारांनी लगावला.

खा. शरद पवार दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. बुधवारी महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्यस्तरीय शिबिरासाठी ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत खा. शरद पवार यांनी विविध मुद्यांवर स्पष्टपणे मते मांडली.

जिल्हा बँकेच्या नव्या संचालक मंडळाला काय मार्गदर्शन कराल? या प्रश्नावर बोलताना खा. शरद पवार म्हणाले, सातारा जिल्हा बँक शिस्तीच्या चौकटीत काम करणारी बँक आहे. स्व. यशवंतराव चव्हाण व किसनवीर यांची परंपरा स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी उचलली. यानंतर ही परंपरा पुढे गेली आहे. बँकेत गेलेले सर्वजण राजकारणी असून त्यांनी बँकेत जाताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावेत. हे मी सांगतो म्हणून नव्हे तर नाबार्डकडून मिळालेल्या पुरस्कारांमुळे समजते. त्यामुळेच सातारा जिल्हा बँक देशात अग्रेसर आहे. एनपीए हे बँकांची आर्थिक स्थिती दर्शवते. सातारा जिल्हा बँकेचा एनपीए हा फार कमी असून घेतलेले कर्ज परत करायची सवय सातारकरांना आहे, अशी कौतुकाची थापही पवारांनी टाकली.

गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचाही पराभव झाला. महाविकास आघाडी म्हणून तुम्ही काहीच केले नसल्याचा त्यांचा आरोप असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना खा. शरद पवार म्हणाले, जिल्हा बँकेसाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असे ठरलेच नव्हते. तशी परिस्थिती इथे नव्हती. राष्ट्रवादीने सहकार पॅनल करत सर्वपक्षीय आघाडी केली. सहकारातील निवडणुका या पक्ष म्हणून घेतल्या जात नाहीत. जिल्हा बँक ही काय पक्षीय निवडणूक नव्हती. ठरलं असेल आणि पाडलं तर तक्रार ठीक आहे. पण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवायची असे ठरलेच नाही. त्यांनी स्वत: निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तो त्यांचा अधिकार आहे.

आ. शशिकांत शिंदे यांच्या पराभवाबाबत विचारलेल्या प्रश्नावर खा. पवार म्हणाले, शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही. मात्र ही निवडणूक शिंदे यांनी अधिक गांभीर्याने घेणे अपेक्षित होते. सहकारी संस्थांच्या निवडणुका पक्ष घेत नसतो. राष्ट्रवादी भवनावर झालेल्या दगडफेकीबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, कधी कधी पराभवामुळे तरुण कार्यकर्ते बिथरतात आणि त्यांच्याकडून असली चूक होते. याबाबत स्वत: आ. शशिकांत शिंदे यांनीच दिलगिरी व्यक्त केल्याने विषय संपला आहे, असे सांगून पवारांनी या विषयावर पडदा टाकला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, पक्ष म्हणून वरिष्ठ नेते एकत्रितपणे धोरण ठरवतील की निवडणुका कशा लढवायच्या? राज्य एका विशिष्ट घटकांनी पुढे घेवून चाललो आहोत. त्यामुळे चर्चा करुन धोरण ठरवले जाईल. निवडणुका पण एकत्रित लढायच्या का? यासाठी विविध घटकांशी बोलणार आहे. एकत्रित निवडणूक लढवायची वेळ आली तर काय करायचे? याचा विचार करावा लागेल. एकत्रिकरणाची स्थिती नसेल तर स्थानिक नेत्यांकडून परिस्थिती जाणून घेवून यावर निर्णय घेवू, असेही खा. पवार यांनी स्पष्ट केलेे.

पुढील तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होवू शकतात.निवडणुकांच्या तयारीसाठी तरुण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी हा मेळावा होता, असेही खा. पवार म्हणाले.

कृषी कायदे मागे घेतल्याच्या निर्णयाबाबत बोलताना खा. पवार म्हणाले, कृषी कायदे मागे घेतल्यामुळे जर नुकसान झाले असेल तर मग ते का मागे घेतले? केंद्र सरकारच्या संदर्भात नाराजी होती की राज्याचा प्रश्न असताना त्यांना विश्वासात घेतले नाही. शेतकर्‍यांच्या संदर्भात धोरण ठरवताना त्यांची चर्चा सदनात होत नाही. काही दिवसात शेजारच्या राज्याच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये कसं होईल, या धास्तीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील उपस्थित होते.

किसन वीर आबांसारखेच काम मकरंद आबांचे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खा. शरद पवार यांनी महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय शिबिर आयोजित करणार्‍या आ. मकरंद पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आज मी ज्या भागात आलो आहे. हा सर्व परिसर पूर्वीच्या काळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व स्व. किसन वीर आबा यांच्या परिस स्पर्शाने व्यापलेला. किसन वीरांच्या शिस्तबद्ध चौकटीत माझा एक सहकारी तयार झाला. लक्ष्मणराव पाटील त्यांचे नाव. किसन वीर आबांसारखीच लक्ष्मणराव पाटील यांचीही करडी शिस्त होती. त्यांना सगळं वेळेत लागायचं. हाच शिस्तबद्धपणा मला मकरंद आबांमध्ये दिसत आहे. राज्यस्तरीय शिबिर महाबळेश्वरात अत्यंत शिस्तबद्धपणे घेऊन मकरंद आबांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे, अशा शब्दांत खा. पवारांनी मकरंद आबांचे कौतुक केले.

हेही वाचलत का?

Back to top button