मारहाणीने तृतीयपंथी आक्रमक; 'त्या' अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी | पुढारी

मारहाणीने तृतीयपंथी आक्रमक; 'त्या' अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर तृतीयपंथी आक्रमक झाले असून, संबंधित अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी तृतीयपंथीयांसह विविध सामाजिक संघटनांनी केली आहे. याप्रकरणी समिती नेमण्यात येणार असून, तिचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. महापालिकेच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर एका अभियंत्याने सुरक्षारक्षक असलेल्या दोन तृतीयपंथीयांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी घडला. या घटनेनंतर संबंधित अभियंत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मारहाणीचा प्रकार समजल्यानंतर तृतीयपंथीयांच्या विविध संघटनांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यात संबंधित अभियंत्याला निलंबित करून त्यावर गुन्हा दाखल करावा, अशा विविध मागण्या केल्या. त्यावर आयुक्तांनी महिला-बालकल्याण समितीमार्फत चौकशी केली जाईल. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे सांगितले. या वेळी मंगलमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या कादंबरी, मानसी, अनिल उकरंडे, एफपीएआयचे प्रवीण सोनावणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button