

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निवडणूकीकरीता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
लोकसभा निवडणूकीत पाचव्या टप्यात २० मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूकीत शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरुवारी (दि.२५) पत्रकार परिषद घेत तयारीची माहिती दिली. निवडणूकीची अधिसूचना शुक्रवारी प्रसिद्ध केली जाईल. त्या वेळेपासून अर्ज विक्री व अर्ज दाखल करता येईल. नाशिक मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या दालनात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात दिंडाेरीची मतदारसंघाची प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती शर्मा यांनी दिली.
नाशिक व दिंडोरी दोन्ही मतदारसंघासाठी २६ एप्रिल ते ३ मे याकाळात सार्वजनिक सुट्टीवगळता अर्ज दाखल करता येईल. उमेदवार व राजकीय पक्षांनी नामनिर्देशन अर्ज भरताना आयोगाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना शर्मा यांनी केल्या आहेत. उमेदवारांच्या सुविधे साठी दोन्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात अभ्यागत कक्ष, अपिल शाखा व सहाय्यक कक्षाची ऊभारणी करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासनाकडून केली गेली आहे.
निवडणूक अधिसूचना घोषित करणे : २६ एप्रिल
उमेदवारी अर्ज भरणे : २६ एप्रिल ते ३ मे (सार्वजनिक सुट्टीवगळून)
दाखल अर्जाची छाननी : ४ मे
अर्ज माघारी : ६ मे (दुपारी ३ पर्यंत)
मतदान : २० मे (सकाळी ७ ते सायंकाळी ५)
मतमोजणी : ४ जुन (सकाळी ८ पासून)
—
-खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार रुपये अनामत रक्कम
-राखीव गटातील उमेदवारासाठी अनामत रक्कम १२ हजार ५०० रुपये
-अर्ज भरताना ऊमेदवारासह पाचजणांना कक्षात प्रवेश
-निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून १०० मीटरच्या आत ३ वाहनांना प्रवेश
-आयोगाकडून जिल्ह्यात ७ निरीक्षकांची नियुक्ती
-४ खर्च निरीक्षक, २ जनरल, एक पोलीस निवडणूक निरीक्षकाचा समावेश
-नाशिक, दिंडोरीत प्रत्येकी २२ भरारी पथकांची नियुक्त
-नाशिक मतदारसंघात २० लाख २४ हजार ८५ मतदार
-दिंडोरीत मतदारसंघात १८ लाख ५१ हजार ९७२ मतदारांची
हेही वाचा –