सातारा जिल्हा बँक निवडणूक : हेवीवेट लढतीत सहकारमंत्र्यांची आठ मतांनी बाजी | पुढारी

सातारा जिल्हा बँक निवडणूक : हेवीवेट लढतीत सहकारमंत्र्यांची आठ मतांनी बाजी

कराड ; पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील कराड तालुका सोसायटी गटात राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढाईत आठ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या लढतीत राज्याचे माजी सहकार मंत्री स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांचे सुपूत्र जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. मागील सहा दशकांपासून एकतर्फी वर्चस्व असणाऱ्या कराड तालुका सोसायटी गटात स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन अध्यायास प्रारंभ झाला आहे.

दोन दशके जिल्हा बँकेवर पाटील उंडाळकर यांचे एकतर्फी वर्चस्व

कराड तालुका सोसायटी गटात एकूण 140 मतदान होते. रविवारी या गटात मोठ्या चुरशीने शंभर टक्के मतदान झाले होते. राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणास लागली होती. तर एकेकाळी जवळपास दोन दशके जिल्हा बँकेवर राज्याचे माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांनी एकतर्फी वर्चस्व राखले होते. 2009 साली झालेल्या निवडणुकीत स्व. विलासराव पाटील – उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचा पराभव करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने बहुमत मिळवले होते. मात्र असे असले तरी कराड तालुका सोसायटी गटात विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपले वर्चस्व कायम राखले होते.

2015 साली झालेल्या निवडणुकीत तत्कालीन आमदार व विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर यांना अप्रत्यक्षपणे विरोध करत आपली ताकद उंडाळकर गटाचे पारंपारिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्र केसरी स्व. पै. संजय पाटील यांचे बंधू पै. धनाजी पाटील यांच्या पाठीमागे लावली होती. या निवडणुकीत पैलवान पाटील यांना 55 मते मिळाली होती. तर भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या मदतीमुळे स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचा विजय सुकर होऊन त्यांना 85 मते मिळाली होती.

या निवडणुकीनंतर नामदार बाळासाहेब पाटील यांनी कराड तालुका सोसायटी गटातून स्वतः लढण्याची तयारी सुरू केली होती. त्यातच 10 महिन्यांपूर्वी जानेवारी 2021 मध्ये विलासराव पाटील-उंडाळकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र काँग्रेस नेते जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील यांनी या जागेवर दावा करत सातारा जिल्हा बँकेसाठी कराड तालुका सोसायटी गटातून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याच गटातून उमेदवारी अर्ज दाखल करत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली होती.

दयसिंह पाटील हे निवडणूक लढवण्याचा भूमिकेवर ठाम

अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि आरोग्य उदयसिंह पाटील यांच्याशी चर्चा करत नामदार बाळासाहेब पाटील यांना बिनविरोध विजयी करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र उदयसिंह पाटील हे निवडणूक लढवण्याचा भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यानंतर उदयसिंह पाटील आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड तालुका सोसायटी मतदारसंघात थेट लढत झाली.

संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता दोन्ही गटांनी मतदारांना सहलीवर पाठवले

संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता दोन्ही गटांनी मतदारांची मोठ्या प्रमाणावर उचलउचली करत मतदारांना सहलीवर पाठवले होते. दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा केला जात होता. त्यामुळेच निकालाबाबत उत्सुकता होती. मतमोजणीनंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच मागील सहा दशकांपासून वर्चस्व असलेल्या कराड तालुका सोसायटी गटात उंडाळकर गटाचे वर्चस्व संपुष्टात आले असून आता नवीन राजकीय अध्याय सुरू झाला आहे.

मागील 11 वर्षाच्या संघर्षाला मूठमाती…

या निवडणुकीत भाजपा नेते डॉ. अतुल भोसले यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. डॉ. अतुल भोसले यांच्यासोबत त्यांच्या समर्थक मतदारांनी नामदार बाळासाहेब पाटील यांना जाहीरपणे समर्थन दिले होते. या निवडणुकीत प्रथमपासून भाजपची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार, असा राजकीय तज्ञांचा अंदाज होता. आता निकालानंतर हेच अधोरेखित झाले असून भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्या भूमिकेमुळे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सेफ झाले आहेत. मागील निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी स्व. विलासराव पाटील उंडाळकर यांना जाहीरपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे स्व. उंडाळकर यांना 30 मतांची मोठी आघाडी मिळाली होती. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत डॉ. अतुल भोसले यांनी मागील 11 वर्षाच्या मतभेदांना मूठमाती देत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी जुळवून घेत त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

Back to top button