दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणून बँकेला गंडा; दोघांना बेड्या | पुढारी

दोन हजार रूपयांच्या बनावट नोटा चलनात आणून बँकेला गंडा; दोघांना बेड्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणून राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेला गंडा घालणाऱ्या राधानगरी तालुक्यातील दोघांना राजारामपुरी पोलिसांनी आज (शुक्रवार) सकाळी बेड्या ठोकल्या.

अनिकेत अनिल हळदकर (वय 27, रा. चंद्रे, तालुका राधानगरी) आणि उत्तम शिवाजी पवार (23, रा. पालकरवाडी, कसबा वाळवा, तालुका राधानगरी) अशी दोघांची नावे आहेत.

उत्तम पवार यांच्या शेतातील खोलीवर पोलीस निरीक्षक सिताराम डुबल उपनिरीक्षक दीपिका जोगळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला.

नोटा छपाईसाठी लागणारी यंत्रसामुग्री, कागद आणि प्रिंटर असे साहित्य यावेळी हस्तगत करण्यात आले आहे.

संशयितांनी गेल्या वर्षभरापासून बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस निरीक्षकांनी पत्रकारांना सांगितले.

मुख्य संशयित अनिल हळदकर हा दिनांक २ ऑगस्ट रोजी राजारामपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेला.

तेथे त्याने त्याच्या खात्यावर दोन हजार रुपये किमतीच्या 67 नोटा जमा केल्या. चौकशीअंती 67 पैकी 17 नोटा संशयास्पद स्थितीत आढळून आल्या.

शिवाय सर्व नोटा एकाच सिरीयल क्रमांकाच्या असल्याने संशय बळावला. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यास संपर्क साधून याविषयी माहिती दिली.

पोलीस पथकाने अनिकेत हळदकर यास ताब्यात घेतले. चौकशीअंती उत्तम पवार याने या बनावट नोटा खपविण्यासाठी हळदकरकडे दिल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस पथकाने बुधवारी रात्री उशिरा पवार याला पालकरवाडी येथून ताब्यात घेतले. दुपारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बनावट नोटा छापून चलनात आणण्याचा प्रयत्न चव्हाट्यावर आल्याने राधानगरी, खानापूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संशयितांनी यापूर्वी किती नोटांची छपाई करून चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे, याची पोलीस माहिती घेत आहेत.

Back to top button