प्रियंका तुपे : मैत्रिणीने सोबत दारु प्यायला, चिल करायला होकार दिला किंवा बॅचलर मैत्रिणीने डिनरला घरी बोलावलं. रात्री उशीर झाला म्हणून घरीच राहा, दुसऱ्या दिवशी जा, असा आग्रह केला. किंवा अगदी एका खोलीत झोपण्याची वेळ आली किंवा स्वत:हून ती तुमच्या खोलीत झोपली तर तो सेक्ससाठी किंवा कोणत्याही रोमँटिक एन्काउंटरसाठी दिलेला कंसेंट (Consent) नसतो.
ती एक सोय किंवा तुमच्या चांगुलपणावर, मोकळेपणावर दाखवलेला विश्वास असू शकतो. त्याची गरिमा राखणे तुमची जबाबदारी आहे. एकदा दिलेल्या कंसेंटची व्हॅलिडिटी लाइफटाइम नसते. कंसेंट दरवेळी घ्यायची/ विचारायची गोष्ट आहे. कंसेंटची गॅरंटी/वॉरंटी नसते. अगं/अरे इथं येण्याआधी तर तुझा कंसेंट होता, आता काय झालं? पहिले तू का हो म्हणलीस मग? असे प्रश्न व्यर्थ असतात. कंसेंटबद्दल कधीही कुणालाही काहीही म्हणायचं असू शकतं.
कंसेंट (Consent) नाही, म्हणल्यावर पुन्हा पुन्हा केलेल्या विनवण्या, नकोसे स्पर्श याला मॅन्युप्लेटर, स्वत:च्या भाषेत -'कन्विसिंग' असं म्हणू शकतो, हे सुद्धा मॉलेस्ट करणंच आहे. स्त्रीवादी बायका मुक्तपणे लैंगिक संबंधावर बोलतात. याचा अर्थ सिग्नल म्हणून घ्यायचा, किंवा त्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, असा नाही. अमुक एका गोष्टीला अशाच एखाद्या स्त्रीवादी मैत्रिणीनं नकार दिला तर याचा अर्थ तिची स्त्रीवादाची बैठक प्रॉब्लमॅटिक आहे किंवा ती संकुचित विचारांची आहे, असा नसून तुम्ही तिची चॉईस नाही आहात, असा आहे.
वैयक्तिक तुम्ही एखाद्या व्यक्तीचा चॉईस नसाल, तसं त्या व्यक्तीने तुम्हाला तोंडावर आणि स्पष्टपणे सांगितलं असेल…तर तुम्हाला तुमच्या मर्यादेत राहायलं हवं आणि या चॉईसचा उगाचच कसल्या कसल्याशी संबंध जोडून स्वत:ला पीडित म्हणून गोंजारणं टाळायला हवं. तुमच्यासोबत मुली/ बायका चावट जोक्स करत असतील तर याचा अर्थ त्या उपलब्ध नसून तुमच्यासोबत कम्फर्टेबल (तेही प्रत्येक गोष्टीसाठी नव्हे) आहेत, असा असतो.
फ्लर्टिंग, डेटिंग, सेक्सटिंग आणि अजून कशाकशासाठीही कंसेंट आवश्यकच आहे. अर्थात तो, मला अमुक करायचं आहे…तुझा कंसेट (Consent) आहे का? इतक्या कृत्रिम आणि थेटपणे विचारता येत नसला तरी, अनेक टप्प्यांवर समोरच्या व्यक्तीला, 'तू कम्फर्टेबल आहेस ना?' इतकं तरी विचारता येतंच.
काहीच अंदाज येत नसेल तर मात्र वेट एंड वॉच करावं किंवा अगदी थेट विचारून टाकावं…पण कंसेंट न समजून, तसा अभिनय करून, माती खाल्यावर परत स्वत:लाच डिफेंड करून, अगदीच कोंडीत पकडलं गेल्यावर सॉरी म्हणून फ्रेंडशिप्स रुईन करू नये. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने हे लिहिलं असलं तरी अगदी रोजच्या आयुष्यात कंसेंटबद्दलची समज असणं महत्वाचं आहे.
पण झालंय काय की आपल्याकडे, 'तू हा कर या ना कर…तू हैं मेरी किरण' किंवा 'लडकी हंसी तो फसी' असे तद्दन बॉलिवुडी संस्कार इतके नसानसात भिनले आहेत की मुलीने एकट्या मित्रासोबत/ ओळखीच्या पुरुषासोबत पिक्चरला जाणं, पब-बारमध्ये जाणं यालाही 'ग्रीन सिग्नल' समजलं जातं. 'लडकी के ना मे हा ही होती हैं' अशा नॅरेटिव्हजमुळेच लोक कंसेंटची भानगड नीट समजून घेत नाहीत आणि तिथेच झोल होतो.
ऑनलाइन पोर्टलवरची कोणतीही बलात्काराची बातमी, लैंगिक अत्याचाराची बातमी काढून बघा, त्याखाली शेकड्याने कमेंट दिसतात…मग ती मुलगी तिकडेच का गेली? अमुक कपडेच घालून का गेली…इतक्याच वाजता का गेली…ती असं वागते मग असे परिणाम होणारच ना…अशा बलात्कारी वृत्तीलाच पाठीशी घालणाऱ्या कमेंट्स असतात. आता या लेखावरही अशा अनेक कमेंट्स येतील, याची खात्री आहेच.
मुळात कंसेंट समजून न घेता, लैंगिक अत्याचारासाठी बाईलाच दोष देणारे पुरुष एक कायदेशीर गोष्ट मात्र सोयीस्कर विसरतात की कोणत्याही प्रकारचे कपडे घालणं, किंवा कितीही वाजता कुठेही फिरणं, पार्ट्या करणं, सहमतीने पुरुषांसोबत नाच-गाणं, सेक्स करणं हा कायद्याने गुन्हा नाही. पण एखाद्या व्यक्तीची संमती नसताना मात्र त्या व्यक्तीला नकोसा स्पर्श करत राहणं, तशी मागणी करणं, इव्हन संमती नसताना पॉर्न दाखवणं, त्या व्यक्तीला अपमानास्पद वाटेल असे सूचक इशारे देणं हावभाव करणं हे सारं मात्र कायद्याने गुन्हा आहे.
पण या सगळ्याला जिथे समाजातले पॉवरफूल, प्रतिष्ठित, समाजात काही एक प्रभाव असणारे लोकही कॅज्युअलीच घेतात, तिथे सामान्य लोकांना याबद्दल किती कळकळीने आणि काय काय ओरडून सांगणार? कंसेटची ही टेप किती काळ वाजवत रहायचं? निर्भया असो खैरलांजी असो की 'मी टु'सारखी मोठी चळवळ की नुकताच दिल्लीतल्या अल्पवयीन मुलीवर पुजाऱ्यासह काही जणांनी केलेला सामुहिक बलात्कार…दरवेळी हे ओरडून ओरडून सांगायचं…पुरुषप्रधान व्यवस्थेतल्या टॉक्सिक पुरुषांचं मात्र 'ये रे माझ्या मागल्या' आहेच. अर्थात बलात्काराची इतर अनेक जातवर्गीय राजकीय कारण असतातच…पण सध्या इथं तो मुद्दा नाही.
यावर आता काही उपटसुंभ स्वसंरक्षणासाठी मिरची पावडर, पेपर स्प्रे, पॉकेट सुऱ्या बाळगण्यापासून ते कराटे शिकायला वगेरे सांगतील…पण हे सगळं स्वसंरक्षणासाठी शिकण्याची वेळच आमच्या समाजातल्या स्त्रियांवर येऊ देणार नाही, असं मात्र म्हणणार नाहीत. त्यामुळे स्त्रियांनीही आता आजूबाजूच्या पुरुषांना कंसेंट (Consent) सतत शिकवण्याच्या भानगडीत न पडता, वेळ, परिस्थिती संदर्भ बघून कोलायला शिकलं पाहिजे. अत्याचार पण आम्हीच सहन करायचा आणि कंसेंट पण शिकवायचा… बरं शिकवूनही तुम्ही शिकणार नाहीच… अब ये ना चॉलबे!