वॉशिंग्टन : मंगळावर खडकांमधून आतापर्यंत अनेक प्रकारचे आभास निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये अगदी डोंगर उतरणार्या व्यक्तीपासून ते एखाद्या वस्तूपर्यंतच्या आभासांचा समावेश आहे. आता 'क्युरिऑसिटी'ने मंगळावर एक 'क्यूट' खडक शोधला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. या खडकाचा आकार एखाद्या मांजरासारखा किंवा सरड्यासारखा आहे.
मंगळभूमीवरील गेल क्रेटरमध्ये हा खडक 'क्युरिऑसिटी'ला आढळून आला. हे रोव्हर याठिकाणी 2012 पासून आहे. हा बाकदार खडक केवळ 6.5 इंच उंचीचा आहे. मात्र, त्याचा अनोखा आकार संशोधकांना आकर्षित करीत आहे.
'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील संशोधक अॅबिगेल फ्रिमन यांनी सांगितले की या खडकाचे 'टेक्स्चर' पाहून मी अचंबित झालो. जमिनीतून ज्या पद्धतीने हा खडक वर आलेला आहे तो अनेक प्रकारचा आभास निर्माण करणारा आहे.
माऊंट शार्पच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीत हा खडक आहे. गेल क्रेटर या नावाने ओळखल्या जाणार्या विवरातील जमिनीपासून या पर्वताची उंची तब्बल 5.5 किलोमीटर आहे. या पर्वताच्या रचनेतील चिखल आणि सल्फेटच्या स्तरांचे 'क्युरिऑसिटी'कडून अध्ययन केले जात आहे.