माचू पिचू ची निर्मिती अनुमानापेक्षा अनेक दशके आधीची! | पुढारी

माचू पिचू ची निर्मिती अनुमानापेक्षा अनेक दशके आधीची!

न्यूयॉर्क : दक्षिण अमेरिकेतील पेरू नावाच्या देशात प्राचीन इन्का संस्कृतीच्या अनेक खुणा पाहायला मिळतात. त्यामध्येच जगप्रसिद्ध माचू पिचू या रचनेचा समावेश होतो.

याठिकाणी सापडलेल्या मानवी अवशेषांची नव्याने रेडिओकार्बन चाचणी करून त्यांचा कालावधी आता निश्चत करण्यात आला आहे. हा कालावधी आधी लावलेल्या अनुमानापेक्षा अनेक दशके आधीचा आहे.

माचू पिचू येथे 1912 मध्ये मानवी सांगाड्याची काही हाडे सापडली होती. त्यांच्यावरून आता नव्याने रेडिओकार्बन डेटस् शोधण्यात आल्या आहेत. त्यावरून हे ठिकाण इसवी सन 1420 मधील असल्याचे दिसून आले आहे.

इन्का साम्राज्याची स्थापना कधी झाली याबाबतच्या पूर्वीच्या अनुमानापेक्षा हे अनेक दशके आधीचे आहे. कनेक्टिकट येथील येल युनिव्हर्सिटीचे आर्किओलॉजिस्ट रिचर्ड बर्गर यांनी सांगितले की माचू पिचू हे जगातील सर्वात प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळांपैकी एक आहे. मात्र, त्याची स्थापना व विस्तार याबाबत बरीचशी संभ्रम करणारीच माहिती उपलब्ध आहे.

आताच्या संशोधनावरून असे दिसून येते की आधीच्या अनुमानापेक्षा किमान वीस वर्षे आधीच ही रचना तयार करण्यात आली. अँडीज पर्वतावर 8 हजार फूट उंचीवर हे ठिकाण आहे. सम्राट पाचाकुटी याच्या काळात माचू पिचूची निर्मिती झाली. स्पॅनिश आक्रमणानंतर हे साम्राज्य उद्ध्वस्त झाले.

Back to top button