पुणे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली शरद पवारांची भेट

बारामती (पुणे) : पुढारी वृत्तसेवा

पिंपरी-चिंचवडहून बदली झालेल्या पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी (दि. २३) सकाळी बारामतीत गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भेटीनंतर कृष्ण प्रकाश यांनी भेटीचा तपशील माध्यमांना देण्यास नकार दिला. ” ये मेरी खासगी मुलाकात थी” , असे म्हणत ते गोविंदबागेतून बाहेर पडले.

कृष्ण प्रकाश यांची नुकतीच पिंपरी-चिंचवडमधून बदली झाली आहे. अवघ्या दीड वर्षात त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पोलिस आयुक्त म्हणून अंकुश शिंदे यांनी तात्काळ पदभारही स्वीकारला आहे. बदलीच्या काळात कृष्ण प्रकाश हे परदेशात होते, असे बोलले जाते. त्यांनी माघारी येताच खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान या भेटीनंतर पवार हे ही कोल्हापूरच्या नियोजित दौऱ्यासाठी निघून गेले. माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आज मला भरपूर कामे आहेत, असे म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आणि ते पुढील प्रवासासाठी निघून गेले.

हेही वाचलत का ?

Back to top button