Jawan Movie : उत्तर-दक्षिणचं हटके कॉम्बिनेशन | पुढारी

Jawan Movie : उत्तर-दक्षिणचं हटके कॉम्बिनेशन

प्रथमेश हळंदे

Jawan Movie : कमाईच्या अनेकानेक विक्रमांची नोंद करत ‘जवान’ने शाहरूखच्या स्टारडमची जादू अजूनही ओसरलेली नाहीये, हेच दाखवून दिलंय. यानिमित्ताने उत्तर आणि दक्षिण हे हटके कॉम्बिनेशन गाजू लागलंय. ‘जवान’च्या यशामागे असलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी हे एक खास
कारण आहे.

2017 मध्ये शाहरूखचा ‘रईस’ रीलिज झाला. एक चांगला अ‍ॅक्शन सिनेमा असूनही पायरसीचा फटका बसल्याने ‘रईस’ला म्हणावा तसा नफा बॉक्स ऑफिसवर कमवता आला नाही. त्यातच पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या मुख्य भूमिकेमुळे अनेक देशप्रेमी संघटनांनी या सिनेमाला विरोध केला. याचाही वाईट परिणाम ‘रईस’च्या कमाईवर झाला. त्यानंतर आलेले ‘जब हॅरी मेट सेजल’ आणि ‘झिरो’ फारशी चमक दाखवू शकले नाहीत. शाहरूख खानची जादू संपल्याच्या चर्चेने जोर धरणं साहजिकच होतं. 2018 च्या ‘झिरो’नंतर मुख्य भूमिकेत न झळकणार्‍या शाहरूखची अवस्था ‘आता उरलो कॅमिओपुरता’ अशीच झाली होती. त्याचा हा पाच वर्षांचा प्रदीर्घ उपवास ‘पठाण’ने सोडवला. या सिनेमाने शाहरूख आणि त्याच्या चाहत्यांना नवसंजीवनी देत शाहरूखची जादू अजूनही कायम असल्याचं सिद्ध केलं.

नुकत्याच रीलिज झालेल्या ‘जवान’ची (Jawan Movie) तिकीटबारीवरची कमाई शाहरूखची ही जादू, हा करिश्मा कधीही संपणार नाही, असं दिमाखात सांगतेय. दिग्दर्शक अ‍ॅटलीचं दमदार कथानक, संगीतकार अनिरुद्धचं झिंग आणणारं संगीत, शाहरूखचा जबरदस्त अभिनय आणि पॅन इंडियन प्रेक्षकांना आपलंसं वाटणार्‍या लोकप्रिय बहुभाषिक सिनेकलाकारांचा नॉर्थ-साऊथ कॉम्बो हे हटके समीकरण ‘जवान’च्या निमित्ताने पाहायला मिळतंय.

‘बाहुबली’च्या यशानंतर भारतातल्या व्यावसायिक सिनेमांचं गणितच बदललं. ज्याला त्याला आपण ‘बाहुबली’सारखा अवाढव्य सिनेमा बनवावा, असंच वाटायला लागलं. हे असं वाटणं साहजिकच असलं तरी तसं प्रत्यक्षात करून दाखवणं अवघड होतं. भले भले ‘बाहुबली’शी स्पर्धा करण्याच्या नादात स्वतःचं हसं करून बसले. त्यातलाच एक सिनेमा होता ‘पुली.’ या तमिळ सिनेमात दलपती विजयने मुख्य भूमिका साकारली होती. (Jawan Movie)

‘पुली’ येईपर्यंत विजयच्या काही सिनेमांना संमिश्र प्रतिसाद मिळत होता. ‘पुली’च्या अपयशामुळे विजयचं गटांगळ्या खाणारं करिअर इथंच थांबतं की काय, असंच चित्र निर्माण झालं होतं. पण तरी विजय निर्धास्त होता. कारण त्याचा ‘तेरी’ हा सिनेमा रीलिज होण्याच्या वाटेवर होता. ‘तेरी’च्या यशाबद्दल विजयला प्रचंड आत्मविश्वास होता. या आत्मविश्वासाचं कारण होतं, ‘तेरी’चा दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार!

‘तेरी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई तर केलीच; पण विजयलाही अपयशाच्या गर्तेतून बाहेर काढलं. त्यानंतर ‘मर्सल’, ‘बिगील’ या अ‍ॅटलीच्याच सिनेमांनी विजयला त्याचं निसटत चाललेलं स्टारडम पुन्हा एकदा मिळवून दिलं. ‘तेरी’पूर्वी फक्त एकाच सिनेमाचं दिग्दर्शन केलेल्या अ‍ॅटलीने विजयला तर त्याचं करिअर सावरून दिलंच; पण त्याचबरोबर तो आता भारतीय सिनेसृष्टीच्या बादशहासाठीही संकटमोचक ठरलाय. (Jawan Movie)

2019 मध्ये ‘बिगील’चं प्रमोशन सुरू असतानाच अ‍ॅटलीने शाहरूखसोबत नव्या सिनेमावर लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करत असल्याची घोषणा केली होती. हा तोच काळ होता, जेव्हा शाहरूखच्या सिनेमांना अपेक्षित प्रतिसाद मिळणं अवघड झालं होतं. पण अ‍ॅटलीसोबत शाहरूख सिनेमा करतोय, या नुसत्या चर्चेनेच ‘जवान’साठी (Jawan Movie) अपेक्षित हाईप तयार झाली. त्यामुळे शाहरूख असेलही बाजीगर; पण त्याला त्याचा खरा जादूगर आता अ‍ॅटलीच्या रूपात सापडलाय, एवढं खरं!

हिंदी सिनेसृष्टी म्हणजेच बॉलीवूडचा शाहरूख आणि तमिळ सिनेसृष्टी म्हणजेच कॉलीवूडचा अ‍ॅटली, हे बेसिक नॉर्थ-साऊथ समीकरण ‘जवान’ने पुढे आणखीनच मोठं केलं. दीपिका पदुकोणसोबतच कॉलीवूडची ‘लेडी सुपरस्टार’ नयनतारा ‘जवान’मध्ये (Jawan Movie) सहनायिका म्हणून झळकली. खलनायकाच्या भूमिकेत कॉलीवूडच्या ‘मक्कल सेल्वन’ विजय सेतुपतीने रंग भरलाय. कॉलीवूडसोबत पूर्ण देशाला आपल्याला तालावर थिरकायला भाग पाडणार्‍या अनिरुद्धने या सिनेमासाठी संगीत दिलंय.

या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतल्या स्मिता तांबे, गिरिजा ओक, बॉलीवूडच्या सान्या मल्होत्रा, रिद्धी डोग्रा, लहर खान, संजिता भट्टाचार्य आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती प्रियमणी या अभिनेत्रींनी सहायक भूमिका बजावल्या आहेत. ‘जवान’च्या तमिळ व्हर्जनमधे सुप्रसिद्ध तमिळ अभिनेता योगी बाबूची झलक दिसते. हा असा वेगवेगळ्या सिनेसृष्टीतल्या सिनेकलाकारांचा भरणा पॅन इंडिया रीलिज झालेल्या ‘जवान’च्या पथ्यावरच पडलाय, हे खरं. (Jawan Movie)

कथानायकाच्या दुहेरी-तिहेरी भूमिका, वडील आणि मुलांच्या नात्यावर भाष्य करणारं उपकथानक आणि फ्लॅशबॅक्स ही तर दिग्दर्शक अ‍ॅटलीची खासियतच बनलीय. आपल्या सिनेमाच्या कथा तो स्वतःच लिहीत असल्याने त्याचं कथानक अगम्य वाटणार नाही, याची खबरदारी आपोआप घेतली जात असते. ‘जवान’मध्येही कथानायकाचा डबल रोल आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फ्लॅशबॅक आहे. कथानायकाचे वेगवेगळे लुक्सही आहेत.

जवळपास अडीच ते तीन तासांच्या सिनेमात एवढ्या सगळ्या कलाकारांना घेऊन, हे सगळं आपल्या कथेत गोवण्याचं शिवधनुष्य अ‍ॅटलीने लीलया पेललंय. पण अ‍ॅटलीच्या या लेखन आणि दिग्दर्शनाला खरी धार चढवलीय ती शाहरूखच्या अभिनयाने. शाहरूखची भावुक करणारी संवादफेक, प्रेमात पाडणारं जंटलमन स्वरूप आणि टाळ्या-शिट्ट्यांच्या कडकडाटात साजरी होणारी अ‍ॅक्शन स्टाईल क्षणाक्षणाला ‘जवान’चा (Jawan Movie) सिनेनुभव अधिकच समृद्ध करत राहते. वास्तविक, शाहरूखचा काही महिन्यांपूर्वी आलेला ‘पठाण’ही बॉक्स ऑफिसवर हिट झालाच होता. पण त्यातला शाहरूख हा दमलेला, म्हातारा आणि तरीही तरुणपणाचा अवास्तव आविर्भाव आणणारा कथानायक वाटत होता. पण ‘जवान’मध्ये मात्र शाहरूख तरुण आणि वयस्कर अशा दोन्ही भूमिकांमध्ये अ‍ॅक्शन हिरो म्हणून आपली छाप पाडण्यात यशस्वी ठरलाय. विशेषतः यातला त्याचा वयस्कर लूक प्रेक्षकांना जास्त भावल्याचं दिसून येतं.

साठीच्या उंबरठ्यावर असलेल्या शाहरूखने ‘जवान’मध्ये (Jawan Movie) म्हातारा बाप साकारत तो आपला सदाबहार रोमँटिक चार्म जपत, अजून काही दशकं अशीच दमदार अ‍ॅक्शन करू शकतो, हे सप्रमाण दाखवून दिलंय. कधी जिप्सी म्हातारा तर कधी जेलर, कधी सैन्य अधिकारी, अशा वेगवेगळ्या लूकमधला शाहरूख आजही ‘बाजीगर’ आहे. त्याची जादू सहजासहजी ओसरत नसते, हेच ‘जवान’च्या कमाईचे आकडे आपल्याला सांगू पाहत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button