Kolhapur Ambabai : बाराशे वर्षांपासून ‘या’ शिलालेखातून प्रकट होतो अंबाबाईचा समृद्ध इतिहास | पुढारी

Kolhapur Ambabai : बाराशे वर्षांपासून 'या' शिलालेखातून प्रकट होतो अंबाबाईचा समृद्ध इतिहास

काही संशोधकांच्या मते इसवी सनाच्या दुसर्‍या शतकापासून महालक्ष्मी मंदिराचे अस्तित्व आहे, तर इसवी सन 634 मध्ये मंदिराच्या गर्भकुटीत देवीची स्थापना झाल्याचे इतिहासतज्ज्ञ मानतात. करवीरनगरीचा ज्ञात इतिहास सर्वसाधारणपणे अडीच हजार वर्षांचा आहे. (Kolhapur Ambabai) अडीच हजार वर्षांपूर्वी करवीरनगरीचा रोमशी व्यापार होता, असे उल्लेख आहेत. या समृद्ध नगरीत श्री महालक्ष्मी देवीचे वास्तव्य आहे. गेल्या बाराशे वर्षांपासून ‘या’ शिलालेखातून श्री महालक्ष्मी देवीचा समृद्ध इतिहास प्रकट झालेला आहे. (Kolhapur Ambabai)

संबंधित बातम्या –

प्राचीन काळातील प्रगत संस्कृतीचा प्रभावशाली वारसा असलेल्या भारतात या प्राचीन संस्कृतीतून साकारलेली अनेक नगरे त्या समृद्धीच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आजही दिमाखदारपणे उभी आहेत. कालमानाप्रमाणे या क्षेत्रांच्या स्वरूपात काही बदल होत गेले; पण भारतातील अनेक तीर्थक्षेत्रे आजसुद्धा आपल्या प्राचीन इतिहासाच्या भक्कम समृद्ध पायावर अभ्यासक, पर्यटक तसे भाविकांना आकर्षित करत आहेत. प्राचीन संस्कृती विकसित झाली ती प्रथमतः नदी तीरावर आज आपण अभिमानाने ज्या आपल्या भारतीय संस्कृतीचा गौरवपूर्वक उल्लेख करतो, त्या संस्कृतीचा इतिहास मूलतः नद्यांच्या तीरावर घडत गेला. (Kolhapur Ambabai)

गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती या सर्वच जीवनदायिनी नद्यांनी भारतीय संस्कृतीला आकार दिला. उत्तरेच्या या महानद्यांचा उगम हिमालयासारख्या भव्य पर्वतरांगांतून होत असल्याने या सर्वच नद्या अफाट जलसंचय असणाऱ्या होत्या, तर दक्षिणेत सह्याद्रीच्या मध्यगिरीच्या वा विध्याद्रीच्या पर्वतरांगातून जन्मलेल्या कृष्णा, कावेरी, गोदावरी इ. नद्यांनी आपल्या कुशीतून अशाच एका संस्कृतीला जन्म देऊन तिची समृद्धी वाढविली. या प्रत्येक नद्यांनी आणि तिच्या उपनद्यांनी भारताचा सांस्कृतिक इतिहास पडविला. हा इतिहास देदीप्यमान करणारे भूमिपुत्र घडवले. मानवी प्रगतीतला महत्त्वाचा घटक म्हणजे श्रद्धा आणि या श्रद्धेची बीजे निर्माण करणारी अनेक तीर्थक्षेत्रे या नदीतीरावर उदयाला आली. कृष्णा नदीची एक महत्वाची उपनदी म्हणजे पंचगंगा आणि या पंचगंगेच्या कुशीतून जन्माला आलेली मातृपूजक संस्कृती म्हणजे महामातृक क्षेत्र या पौराणिक नावाने उदयाला आलेली जगतजननी करवीरनिवासिनीचे मूळ स्थान असलेली कोल्हापूरनगरी. (Kolhapur Ambabai)

कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास संशोधकांना इतक्या प्राचीन काळापर्यंत घेऊन जातो. डॉ. रघुना पासारख्या संशोधकांनी या कोल्हापुरातील मानवाच्या अश्मयुगीन काळातील पुरावे शोधून काढले आहेत. ताणलेल्या धनुष्याच्या दोरीप्रमाणे तसेच वैशिष्ट्यपूर्ण वळण घेऊन वाहणाऱ्या नदीप्रवाहाने काही भूभागांची नैसर्गिक समृद्धी वाढवली. बुद्धिमान मानवाने अशी स्थाने ओळखली. यातीलच एक स्थान म्हणजे कोल्हापूर. इथे विकसित झालेल्या संस्कृतीचे मुख्य श्रद्धास्थान मातृदेवता होते. म्हणून देवीच्या अनेक रूपातील उपासना इथे पूर्वीपासून प्रचलित झाल्या.

मंदिराचे गर्भागार कर्णदेव नामक एका चालुक्याच्या सुभेदाराने ६३४ साली बांधले, असा इतिहासतज्ञांचा तर्क आहे. पुढे शिलाहार वंशातल्या मारसिंह राजाने या मंदिराचा कलापूर्ण विस्तार केला व त्याच वंशातल्या गंडरादित्याने त्यावर कळस चढविला. यादवांच्या सत्ताकाळात १२१८ साली या मुख्य मंदिराला महाकालीचे व महासरस्वतीचे अशी दोन मंदिरे जोडली गेली.

देवी भागवतात महालक्ष्मी व करवीरनगरी यांचे दोन ठिकाणी संयुक्त उल्लेख आहेत. पार्वतीच्या रूपाला महालक्ष्मी असे नाव असल्याचेही त्यात सांगितले आहे. मुसलमानी अमलापर्यंत या महालक्ष्मीचे महत्त्व सातत्याने वाढत होते. मुसलमानी राजवटीत देवीची मूर्ती एका पुजाऱ्याच्या परी सुरक्षित ठेवण्यात आली. १७१५ माली मंदिरात तिची पुनर्प्रतिष्ठा झाली.

नवव्या शतकातील राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या एका ताम्रपटात (इ.स. ८७१) महालक्ष्मीचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. प्रजेच्या कल्याणासाठी श्री महालक्ष्मीला आपली करांगुली अर्पण करणारा या राजाला वीरनारायण या पदवीने गौरविण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील संजान गावात सापडलेल्या या सर्वप्रथम ऐतहासिक लिखित पुराव्यावरून महालक्ष्मीच्या अस्तित्वाचे प्राचीनत्व कळते. (Kolhapur Ambabai)

ऐतिहासिक लिखित पुराव्यावरून महालक्ष्मीच्या अस्तित्वाचे प्राचीनत्व कळते. या ताम्रपटात कोल्हापूर क्षेत्राचा उल्लेख नसला तरी स्थात वर्णन केलेली महालक्ष्मी म्हणजे करनवाली, असे अनेक संशोधकांनी मान्य केले आहे. या ताम्रपटात राजाने देवीची स्थापना केल्याचा उल्लेख नाही. त्या काळाच्या कितीतरी आधी जनमानसा श्रद्धेचे स्थान बनलेली ही देवी या क्षेत्रात होती, हे ताम्रपटामधील प्रसंगावरून सिद्ध होते. ग. ह. खेर यांच्यासारखे ज्येष्ठ संशोधक या देवीचे स्थान अमोघवर्षापूर्वी किमान दोनशे वर्षे इथे स्थापित झाले असावे, असे मानतात. तर प्रा. के. जी. कुंदनगरसारखे संशोधक मंदिराच्या अस्तित्वाचा हा काल इ.स.च्या दुसऱ्या शतकापर्यंत असावा, असे मत व्यक्त करतात.

इतिहास संशोधकांच्या या मतमतांतरापलीकडे जाऊन आपण देवीचे स्थान आठव्या शतकाच्या पूर्वीपासून स्थापित होते, असे मानूया. याबाबत ताम्रपट शिलालेख यासारख्या साधनांच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेऊया.

इ. स. १०३८ सालच्या सवाइ ताम्रपटात कदंब कुळातील राजा पष्ठदेव हा तीर्थयात्रा करत असताना कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेत असे, असा उल्लेख येतो. या ताम्रपटातील ‘सदाराधिता (म्हणजे नित्य आराधना करणारा हा शब्द महत्वाचा आहे. हा राजा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचाच उपासक असावा म्हणून तो तिची सतत आराधना करीत असे. कोल्हापूरच्या क्षेत्रस्वामिनी देवतेचे नाव एक हजार वर्षांपूर्वीपासून महालक्ष्मी हे प्रचलित होते. याचा हा ताम्रपट म्हणजे अस्सल दस्तऐवजी पुरावाच होय.

विजापूर जिल्ह्यातील बागलकोट तालुक्यात शिरूर गावातल्या सिद्धेश्वराच्या मंदिरातील शिलालेखातून महालक्ष्मीच्या स्वरूपाचे सविस्तर वर्णन येते. चाणक्य राजा सामेश्वर पहिला व दुसरा यांच्या कालखंडात म्हणजे इ.स. १०४८ ते १०६८ या काळातील या शिलालेखाची लिपी कानडी व भाषा संस्कृत आहे. या शिलालेखात कोल्हापूर हे स्थान शिवक्षेत्र असून ६४ योगिनी आणि सिद्ध गणांनी परिवेष्टित महालक्ष्मी ही रुद्राची अर्धांगिनी असल्याचे म्हटले आहे. देवीचे वाहन सिंह असल्याचाही उल्लेख यात आहे. करवीरनगरी विशाल तीर्थांसह सातशे तीर्थांनी पवित्र नगरी असल्याचे यात वर्णन आहे. ‘करवीर महात्म्य’ ग्रंथातसुद्धा या क्षेत्रातील तीर्थांची संख्या नेमकी इतकीच वर्णन केलेली आहे…

शिलाहार राजा मारसिंह याच्या १०५८ सालच्या ताम्रपटात या राजाने स्वतःला ‘श्री मन्महालक्ष्मी लब्धवर प्रसादादी’ अशा बिरुदाने गौरवले आहे. या कालखंडातील शिलाहारांच्या अनेक ताम्रपटात व शिलालेखातून राजांनी स्वतःचा उल्लेख श्री महालक्ष्मीचा कृपाप्रसाद प्राप्त असणारा, असे केले आहे. महालक्ष्मी मंदिराच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा सिंघणदेव यादव दुसरा याच्या कारकीर्दीतील अत्यंत महत्त्वपूर्ण शिलालेख श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातच आहे. (या शिलालेखावरील मजकुराचा अन्वयार्थ जाणून घेण्यापूर्वी या शिलालेखाच्या सध्याच्या अवस्थेबद्दल मनात व्यक्त होणारी हळहळ या ठिकाणी मांडली पाहिजे. महाद्वारातून मंदिर प्रकारात प्रवेश करताना डाव्या बाजूस गणपती मंदिराच्या बाह्यमंडपावरील एका खांबावर कोरलेला हा श्री महालक्ष्मीच्या इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार काळ्या ऑईलपेंटने रंगविल्यामुळे पुसट झाला आहे. हे असेच चालू राहिले तर लवकरच हा अनमोल ऐतिहासिक दस्तऐवज अदृश्य होईल.) या शिलालेखात महालक्ष्मीच्या मूर्तीचे वर्णन आहे आणि मजकुरापूर्वी शंकराला वंदन केले आहे. शिवक्षेत्र आणि शक्तिपीठ अशा दोन्ही उपासना पद्धतीचे तीर्थधाम म्हणून कोल्हापूरची ख्याती होती, हे यावरून समजते. मस्तकावर शेष आणि लिंग धारण करणारी, पापांचा ओघ हरण करणारी, भवसागरातून तारून नेणारी महालक्ष्मी, जिला सिंघणदेव या राजाने अनेक आभूषणे दिली आहेत, असा उल्लेख या शिलालेखात आहे. या सिंघणदेवाच्या आज्ञेने त्याच्या तैलंग नामक सेवकाने महालक्ष्मीसमोर भव्य तोरण निर्मिती केल्याचा उल्लेख असलेला हा शिलालेख इ.स. १२१८ मधील आहे. (हे तोरण म्हणजे महाद्वार!)

श्री महालक्ष्मीबरोबरच महाकालीचेही मंदिर होते, असा स्पष्ट उल्लेख असलेला १२३६ सालचा शिलालेख पूर्वीच्या रावणेश्वर तलावाजवळ होता. (सध्या तो टाऊनहॉल म्युझियममध्ये आहे.) या शिलालेखातही जंबुद्वीपातील शिवक्षेत्र असलेल्या आणि साऱ्या यैलोक्याला वंदनीय असणाऱ्या श्री महालक्ष्मी व महाकाली या देवतांना वंदन करण्यात आले आहे. चौसष्ट योगिनींसह महालक्ष्मी व महाकाली मंदिरामुळे हे क्षेत्र दक्षिण वाराणसी शिवक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते व श्री महालक्ष्मी पीठाधिपती होती, असा उल्लेख असलेला शिलालेख शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट इथे असून त्याचा काळ १२५२ इ. स. असा आहे.

वरुणतीर्थ नावाच्या सरोवराचे रक्षण करणाच्या महालक्ष्मीस वंदन करणारा शिलालेख यादव नृपती रामदेव याच्या कारकीर्दीतील (१२७२) असून तो या तळ्यानजीक सापडला आहे. (वरुणतीर्थ तलाव आता बुजवण्यात आला आहे. त्या ठिकाणी गांधी मैदान उभे राहिले आहे.)

देवी भागवतात महालक्ष्मी व करवीर यांचे दोन ठिकाणी संयुक्त उल्लेख आहेत. कोल्हापुरातील पार्वतीच्या रूपाला महालक्ष्मी असे नाव असल्याचेही ‘देवी भागवतात’ सांगितले आहे. या देवीला अंबाबाई असेही म्हणतात. महाराष्ट्रातल्या स्त्रिया अंबाबाईला सौभाग्याची देवता मानतात. तिच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. त्या तिची खणा-नारळाने ओटी भरतात व शुक्रवारी, मंगळवारी तिच्या कृपेसाठी उपवास करतात. कोल्हापूर हे शक्तिक्षेत्र म्हणून समजले जाते व कोल्हापुरातील महालक्ष्मी देवी म्हणजे आदिशक्तीचे रूप आहे.

अशा अनेक शिलालेख व ताम्रपटातून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराचा इतिहास उलगडत जातो. धारवाड जिल्ह्यातील सोर्डर गावातल्या कल्लेश्वर मंदिरातील संस्कृत, भाषा व कानडी लिपीमधील एका शिलालेखात महालक्ष्मीचे। वर्णन आहे. विक्रम वर्ष १६ प्रजापती संक्रांत (२५ डिसेंबर, १०११) चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याच्या कारकीर्दीतील या शिलालेखात कोल्हापुरची महालक्ष्मी ही सोर गावची रक्षण करणारी देवी आहे, असा उल्लेख आहे. यावरून राज परिवार, एखादे क्षेत्र यांचा संपूर्ण प्रतिपाळ करणारी देवी म्हणून कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ख्याती दूरवर पसरली होती, हे सिद्ध होते..

सन ११०६ च्या शिलालेखात शके १०२८ मधल्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने याच चालुक्य राजाने महालक्ष्मीच्या पूजा-अर्चेसाठी जमीन व घर दान केल्याचा उल्लेख आहे. यावरून या कालखंडात श्री महालक्ष्मी मंदिरात प्रस्थापित असणारी देवी होती, हे सिद्ध होते. शिलाहार वंशाचा कोल्हापुरातील अखेरचा राजा भोज द्वितीय याने २५ डिसेंबर, ११९० रोजी संक्रातीच्या निमित्ताने पन्हाळ्यातील उमामहेश्वराबरोबर कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी: त्रिकाल : नवेद्यासाठी दान केल्याचे वर्णन भोजराजाच्या शिलालेखात येते. शिलाहार राजपरिवाराचा पराभव करून सत्तेवर आलेल्या देवगिरीच्या यादवाचीसुद्धा महालक्ष्मीवर तितकीच श्रद्धा होती व आज दिसणाऱ्या भव्य मंदिराची बांधणी याच दोन राजवंशाच्या कारकीर्दीत झाला असावी, असे मंदिराचा अभ्यास करताना लक्षात येत.

Back to top button