बेळगाव : निपाणीत कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडला | पुढारी

बेळगाव : निपाणीत कॉन्ट्रॅक्टरचा बंगला फोडला

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : शहराबाहेरील पंतनगर येथील रहिवासी क्लास वन कॉन्ट्रॅक्टर सी. एम. जोनी यांच्या बंद बंगल्याचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी घडवून आणल्याचा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. या घटनेत चोरट्यांनी जोनी यांच्या घरातून सुमारे 50 तोळे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्‍कम 5 लाख असा एकूण सुमारे 30 लाखांचा ऐवज लंपास केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे जोनी हे गुरुवारी आपल्या कुटुंबीयांसमवेत आंबोली येथे पर्यटनाला गेले होते. नेमकी हीच वेळ साधून चोरट्यांनी चोरी घडवून आणल्याने पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहराबाहेरील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पंतनगरात जोनी यांचा स्वतःच्या मालकीचा बंगला आहे.जोनी हे गुरुवारी सकाळी आपल्या कुटुंबीयासमवेत आंबोली येथे गेले होते, ते सायंकाळी घरी आल्यानंतर बंगल्याचा मागील दरवाजा त्यांना उघडा दिसल्याने त्यांनी घरात इतरत्र पाहणी केली असता चोरीचा नेमका प्रकार दिसून आला. दरम्यान, जोनी यांनी तातडीने शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी तातडीने उपअधीक्षक बसवराज यलीगार सीपीआय संगमेश शिवयोगी, शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर, ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार, बसवेश्‍वर पोलिस ठाण्याचे आनंद कॅरीकट्टी, खडकलाट पोलिस ठाण्याचे लक्ष्मापा अरी यांच्यासह एलसीबी पथकाचे कर्मचारी शेखर असोदे, श्रीशैल गळतगे, एम. एफ. नदाफ, राजू दिवटे यांच्यासह पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली.

यावेळी चोरट्यांनी जोनी यांच्या घरातील लाकडी कपाटातील सुमारे 50 तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम पाच लाख असा एकूण 30 लाखांचा ऐवज व मुद्देमाल लंपास केल्याचे दिसून आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपअधीक्षक यांनी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्याशी संपर्क साधला. रात्री उशिरा घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी परिसरात मोठी गर्दी झाली होती. याबाबत रात्री उशिरा जोनी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी चालवला आहे.

पर्यटनाला गेल्याची वेळ चोरट्यांनी साधली….
जोनी हे गुरुवारी सकाळी आपल्या कुटुंबियासमवेत बंगल्याला कुलूप लावून आंबोली येथे पर्यटनाला गेले होते. चोरट्यांनी नेमकी हीच वेळ साधून बंगल्याच्या मागील बाजूच्या दरवाजा फोडून आतमध्ये प्रवेश करून धाडसी चोरी घडवून आणली. विशेष म्हणजे यापूर्वी जोनी हे आंबा मार्केट परिसरात भाडोत्री घरात राहावयास होते. त्या ठिकाणीही चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी ठरला होता.

सहा महिन्यांत तीस घरफोड्या
विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांमध्ये शहर पोलिस ठाणे अंतर्गत शहर व उपनगरात आतापर्यंत 30 घरफोड्या झाल्या आहेत. यातील केवळ पाच घरफोड्यांचा तपास लागला असून, इतर घरफोड्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. असे असताना चोरट्यांनी गुरुवारी धाडसी चोरी करून तब्बल 50 तोळे सोने, रोकड लंपास केल्याने पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून तपासाबाबतचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास
दरम्यान, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन रात्री उशिरापर्यंत या घटनेच्या तपासाला गती दिली होती. या घटनेच्या तपासाठी परिसरातील सर्व उपनगरे पोलिसांनी रात्रभर पिंजून काढली.

Back to top button