सोलापूर : ऋतुराजच्या खुनानंतर 12 वर्षांनी आबाचा खून

सोलापूर : ऋतुराजच्या खुनानंतर 12 वर्षांनी आबाचा खून

सोलापूर ः  गामा पैलवानचा मुलगा ऋतुराज शिंदे याचा 2006 साली खून झाला होता. ऋतुराजच्या खुनात आबा कांबळे मुख्य आरोपी होता. त्या खुनाच्या गुन्ह्यात आबा कांबळेला शिक्षा झाली होती. 2014 साली आबा कांबळे शिक्षा भोगून परत आला होता. ऋतुराजच्या खुनानंतर बारा वर्षांनी आबाचा खून झाला होता.

आबा कांबळे खूनखटल्यात भाचा शुभम धुळराव (रा. उत्तर कसबा, महात्मा गांधी रोड) याने फिर्याद दिली होती. शुभमच्या फिर्यादीनुसार, ऋतुराज खूनखटल्यातून शिक्षा भोगून आबा कांबळे बाहेर आल्यानंतर ऋतुराजचा भाऊ रविराज हा आबाच्या पाळतीवर होता. अधूनमधून रविराज हा मोटारसायकलवरून चकरा मारून आबाला रागाने बघून इशारे करायचा. आबाचा खून होण्याच्या एक महिनाआधी शुभम आणि आबा हे दोघे जेवण करून घरासमोर बसले होते. तेव्हा रविराज शिंदे, सूरज साळुंखे या दोघांनी मोटारसायकलवरून घरासमोरून चकरा मारल्या. रविराज याने आबाला तुला बघून घेतो, तू जास्त दिवस राहणार नाहीस, अशी धमकी दिली होती. त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांनी रविराज हा मोटारसायकलवरुन एकटाच आला. त्याने आबाला हत्यार दाखवून खुन्नस दिली होती. ऋतुराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कट रचून गामा पैलवान, रविराज शिंदे आणि इतर आरोपींनी आबाचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

मोबाईल गल्लीत होते दुकान

मृत आबा कांबळे हा एकटाच होता. त्याच्या घराचे बांधकाम चालू असल्याने तो भाचा शुभम धुळराव याच्याकडे राहायला होता. नवी पेठ परिसरातील मोबाईल गल्लीत आबाचे 'आराध्या' नावाचे मोबाईल रिपेअरचे दुकान होते. आबा आणि भाचा श्रीशैल हे दुकानाचे काम पाहात होते.

बारीक पाऊस अन् रायगडाची चर्चा

आबा कांबळेचा खून सात जुलै 2018 रोजी झाला होता. घटनेच्या दिवशी भाचा श्रीशैल याने दुकान बंद करून मामा आबा कांबळेचा दुकानाचा हिशोब दिला. त्यानंतर श्रीशैल घराकडे निघून गेला. त्यावेळी बारीक पाऊस सुरू होता. यातील नेत्र साक्षीदार असलेला विकी पवार, आबा कांबळे, पप्पू चव्हाण हे मोबाईल गल्लीतील दर्गाह परिसरात आडोशाला थांबले होते. त्यांची रायगडला जाण्याबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी आबावर वार केले होते.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल

आबा कांबळे खूनखटल्यात फौजदार चावडी पोलिसांत आरोपींवर खुनासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. शहर पोलिस दलातील विभाग एकच्या तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. सध्या डॉ. काळे या सोलापूर शहर पोलिस दलात गुन्हे शाखेच्या उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. सोलापूर येथून पदोन्नतीवर डॉ. दीपाली काळे अहमदनगर येथे गेल्या होत्या. बदलीनंतर त्या पुन्हा सोलापुरात आल्या आहेत.

पोलिस निरीक्षक जगतापांनी नोंदविला जबाब

आबा कांबळेचा खून झाला तेव्हा फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून संजय जगताप कार्यरत होते. त्यांनीच फिर्यादी शुभम धुळराव याचा जबाब घेतला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केला होता. त्यानंतर तपास तत्कालीन सहाय्यक आयुक्त डॉ. दीपाली काळे यांच्याकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांची बदली सोलापुरातून पुणे ग्रामीण येथे झाली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांची बदली सोलापूर ग्रामीण येथे झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news