विद्यार्थ्यांची होणार मज्जा ! यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार बूट-मोजे | पुढारी

विद्यार्थ्यांची होणार मज्जा ! यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार बूट-मोजे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी बूट आणि मोजे मोफत मिळणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी सर्व जिल्हा परिषदांचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी आणि काही महापालिकांच्या प्रशासन अधिकार्‍यांना स्पष्ट निर्देश
दिले आहेत. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. 1 ली ते 8 वी मध्ये शिक्षण घेत असणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याचा लाभ शालेय व्यवस्थापन समितीमार्फत देण्याची नवीन योजना शासनाने सुरू केली आहे.

त्याअनुषंगाने दि. 6 जुलै 2023 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत योजनेंतर्गत एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे याकरिता प्रति लाभार्थी 170 रुपये असा दर निश्चित करण्यात आला आहे. तसेच या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे बूट एक समान दर्जाचे असण्याकरिता शासनाने दि.16 जानेवारी, 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये बूट व पायमोजे यांचा लाभ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

त्यानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही विहित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन निर्णय 6 जुलै 2023 व शासन परिपत्रक दि.16 जानेवारी 2024 नुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे यांचा लाभ देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत आवश्यक ती कार्यवाही होणे आवश्यक असल्याने शाळा व्यवस्थापन समितींना सूचना देण्यात याव्यात, असेदेखील डांगे यांनी स्पष्ट केले आहे.

पुस्तके आणि बूट पहिल्याच दिवशी

राज्यात पात्र विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येत असते. परंतु यंदा बूटदेखील देण्यात येणार आहेत. दरवर्षी साधारण हिवाळ्यात बुटांचे वाटप झाल्याचे दिसून येते. यंदा मात्र विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके आणि बूट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा

Back to top button