नंदुरबार : गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न; गोळ्या जिवंत आढळल्याने लक्कडकोट प्रकरणाचे वाढले गूढ | पुढारी

नंदुरबार : गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न; गोळ्या जिवंत आढळल्याने लक्कडकोट प्रकरणाचे वाढले गूढ

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : नवापूर तालुक्यातील गुजरात सीमेला लागून असलेल्या लक्कडकोट गावात स्विफ्ट कारमधून अचानक आलेल्या दोघांनी गोळीबार करीत हल्ला केल्याची (गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न) फिर्याद एका तरुणाने दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. परंतु, घटनास्थळी आढळून आलेल्या दोन्ही गोळ्या जिवंत असून प्रत्यक्षात गोळीबार झालेला नाही असे पोलिसांना आढळून आल्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखीन वाढले आहे.

अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यात गुजरात हद्दीलगत लक्कडकोट गाव आहे. सीमेलगतचा हा परिसर अवैध धंद्यांच्या संदर्भाने सातत्याने चर्चेत असतो. या भागातून चालणारी मद्य तस्करी, लाकूड तस्करी, मोठे जुगार आणि तत्सम अनेक अवैध धंद्यामुळे हा आंतरराज्यीय अड्डा म्हणूनच गणला जातो. अशा या लक्कडकोट गावातील प्रवीण गावित नामक तरुणावर गोळीबार केल्याची घटना रात्री घडली. (गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न )

प्रवीणने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२९) रोजी रात्री साडेआठ वाजता प्रवीण चिकन सेंटर या दुकानावर बसलेला होता. या दरम्यान गुजरातकडून आलेली स्विफ्टकार ( क्रमांक. जीजे ५- ३२१५) प्रवीण चिकन सेंटरपासून काही अंतरावर थांबली. काळे जॅकेट आणि टोपी परिधान केलेले दोघेजण या कारमधून खाली उतरून काहीतरी शोधू लागले. यानंतर त्यातील एक जण प्रवीणच्या जवळ येऊन पार्सल आहे का? अशी विचारणा केली.

यावर प्रविण चिकनचे पार्सल नाही असे म्हणताच ती व्यक्ती कार जवळ गेली. काही सेंकदांच्या आत व्यक्तीने पुन्हा प्रविण जवळ येवून पिस्तूलातून एक गोळी झाडली. यात किरकोळ जखम होऊन प्रवीण खुर्चीतून खाली पडला. यानंतर त्यांने मारून फेकण्यासाठी खुर्ची उचलली तोपर्यंत त्या व्यक्तीने दुसरी गोळी झाडली. सुदैवाने ती लागली नाही. तेवढ्यात हल्लेखोर कारमध्ये बसून वेगाने भोकरवाडा, किरणपुराच्या दिशेने पसार झाले.

घटना समजताच रात्री मोठ्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी तातडीने गुजरात सीमेवरील नाका-बंदी करण्याचे आदेश दिले. यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवून पथक स्थापन करीत तपासाला वेग दिला. अतिरिक्त अधिक्षक विजय पवार, उपअधिक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक रवींद्र कळमकर, नवापूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक भापकर यांनी तपासास सुरूवात केली आहे.

तपासात पोलिसांना घटनास्थळी दोन गोळ्या पडलेल्या आढळून आल्या. पण त्या दोन्ही गोळ्या जिवंत असून गोळीबार झालेला नाही असे पोलिसांना समजले आहे. हल्ल्याची घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली? हल्लेखोरांनी नेमके कशाचे पार्सल मागितले? हल्लेखोर गुजरातचे असावेत का? गोळ्या झाडल्या जाण्याची प्रक्रिया घडलेलीच नाही, तर या प्रकरणाचे गांभीर्य आणखी काय असू शकते? अशा अनेक अंगाने तपासकार्य सुरू झाले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button