पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार : राजनाथ सिंह | पुढारी

पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होणार : राजनाथ सिंह

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे लोक स्वतः भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन होईल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान राजनाथ सिंह यांनी हे भाष्य केले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर भारतविरोधी वक्तव्य केले होते. त्या टिप्पणीबद्दल विचारले असता, राजनाथ सिंह म्हणाले, “ते कधी काश्मीर घेऊ शकतात का? त्यांना पाकव्याप्त काश्मीरबद्दल काळजी वाटली पाहिजे. आम्ही दीड वर्षांपूर्वी सांगितले होते की, हल्ला करून काश्मीर काबीज करण्याची गरज नाही. कारण तेथे अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे की तेथील लोक स्वतः भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत.

राजनाथ सिंह यांना या कार्यक्रमात विचारण्यात आले की, काश्मीरबाबत सरकार काही योजना आखत आहे का? यावर ते म्हणाले की, “आम्ही कोणत्याही देशावर हल्ला करणार नाही. भारताचे वैशिष्ट्य असे आहे की, तो जगातल्या कोणत्याही देशावर कधीही हल्ला करत नाही आणि कधी हल्ला केला नाही. इतरांचा एक इंच प्रदेशावर आम्ही कधी कब्जा केला नाही. पण पीओके आमचा होता आणि आमचाच आहे. मला विश्वास आहे की पीओके स्वतःच भारतात विलीन होईल, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.

याआधी फेब्रुवारीमध्ये पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील राजकीय कार्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी दावा केला होता की पीओकेमधील लोक पाकिस्तानच्या छळाला कंटाळले आहेत आणि आता ते भारतात विलीन होण्याची मागणी करत असल्याचे ते म्हणाले होते.

चीनवर काय म्हणाले राजनाथ सिंह?

चीनने भारतावर हल्ला केला का, असे विचारले असता, अशा चुका न करण्याची बुद्धी देवाने द्यावी, असे राजनाथ सिंह म्हणाले. ते म्हणाले की, आमच्यावर कोणत्याही देशाने हल्ला केला तर आम्ही त्याला सोडत नाही. पण हेही खरे आहे की आपले सर्व शेजाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. चीनकडून येणाऱ्या कोणत्याही धोक्याचा भारत सामना करेल.

हेही वाचा : 

Back to top button