कोल्हापूर : प्राधिकरणातील शहरालगतच्या गावांत अनधिकृत बांधकामांना ऊत | पुढारी

कोल्हापूर : प्राधिकरणातील शहरालगतच्या गावांत अनधिकृत बांधकामांना ऊत

पवन मोहिते

कसबा बावडा : कोल्हापूर शहराच्या आसपासच्या 42 गावांच्या सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र प्राधिकरणचे कामकाज 2018 मध्ये सुरू झाले; परंतु यामध्ये समाविष्ट गावांमध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. विशेष म्हणजे काही ग्रामपंचायतींच्या 2014-15 दरम्यानच्या खोट्या परवानग्या आणि करवीर तहसीलचे खोटे गुंठेवारी दाखले सादर करून राजरोसपणे रो हाऊसचा बाजार सुरू आहे. याबाबत प्राधिकरणकडे तक्रार झाली; पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे क्षेत्रफळ 345 चौरस किलोमीटर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार प्राधिकरणामध्ये समाविष्ट गावांची लोकसंख्या 9 लाख 20 हजार आहे. प्राधिकरणामध्ये करवीर तालुक्यातील शिंगणापूर, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळिवडे, गांधीनगर, चिंचवाड, सरनोबतवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, उचगावसह 38 व हातकणंगले तालुक्यातील शिरोलीसह चार अशा 42 गावांचा समावेश आहे.

प्राधिकरणाची परवानगी न घेताच रो हाऊसचा बाजार धडाक्यात सुरू आहे. यामध्ये अनेक ‘गुंठामंत्री’ सक्रिय आहेत. 2015 पर्यंत ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार होते. मोठ्या आर्थिक व्यवहारातून या वर्षातील अथवा त्यापूर्वीच्या बांधकाम परवानग्या घेऊन रो बंगलो बांधण्यात येत आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक परवानग्यांची ग्रामपंचायतींच्या दप्तरी नोंदच नाही. 2010 ते सन 2015 दरम्यान करवीर तालुक्यात तहसील कार्यालयातून सुमारे साडेतीन हजार गुंठेवारी आदेश देण्यात आले.

Back to top button