करवीरकरांच्या फुटबॉल प्रेमाची मुलूखगिरी | पुढारी

करवीरकरांच्या फुटबॉल प्रेमाची मुलूखगिरी

सागर यादव

कोल्हापूर : कोल्हापूर बॉईज फुटबॉल क्लब (केबीएफसी) हे नाव ऐकताच क्रीडाप्रेमींकडून भुवया उंचावून हा आणि कोणत्या पेठेतील, कुठल्या तालमीचा फुटबॉल संघ, असा सवाल केला जातो. कोल्हापूरमधून शिक्षण, नोकरी, व्यवसाय यासाठी बाहेर राहणार्‍या व्यक्तींना नेहमी एक खंत असायची. ती म्हणजे लहानपणापासून आपल्या जडणघडणीचा महत्त्वपूर्ण भाग असलेला फुटबॉल दुरावला असल्याची. ही खंत भरून काढत कोल्हापूरच्या बाहेर असणार्‍या फुटबॉलप्रेमींनी एकत्रित येऊन कोल्हापूर बॉईज फुटबॉल क्लब (केबीएफसी) ची स्थापना केली आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरातील पेठापेठांत तालीम संस्था निर्माण करून क्रीडा परंपरेचा भक्कम पाया रोवला. छत्रपती राजाराम महाराज यांनी फुटबॉलसारखे आंतरराष्ट्रीय खेळ या क्रीडानगरीत विकसित केले. शतकी परंपरा लाभलेला फुटबॉल खेळ कोल्हापूरची अस्मिता बनला आहे. शाळेच्या प्रांगणापासून ते कॉलेज कॅम्पस्पर्यंत फुटबॉलने सर्वांना एकत्र बांधले आहे.

6 वर्षांत 180 सदस्य…

कोल्हापूरचे अनेक युवक नोकरी-उद्योग-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात आहेत. या कोल्हापूरकरांच्या फुटबॉल खेळाच्या समान आवडीतून सहा वर्षांपूर्वी म्हणजेच सन 2018 मध्ये कोल्हापूर बॉईज फुटबॉल क्लब (केबीएफसी) ची संकल्पना रुजली. पुण्यात राहणार्‍या कोल्हापुरी लोकांसाठी फुटबॉल खेळाच्या माध्यमातून एकत्रित करणारा हा क्लब सुरू करण्यात आला. स्थापनेपासून ‘केबीएफसी’ खिलाडूवृत्तीचे दीपस्तंभ बनून ताकदीने वाढत आहे. आज क्लबमध्ये 180 हून अधिक फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकर ‘केबीएफसी’मध्ये सदस्य आहेत. प्रत्येकजण फुटबॉलवरील त्यांचे प्रेम जोपासत त्यांच्या व्यावसायिक जबाबदार्‍या पार पाडत आहेत.

वर्षभर नियमित सराव, स्पर्धा खेळणे, सामने पाहायला जाणे, स्पर्धा भरवणे या फुटबॉलसंदर्भातील गोष्टींसोबतच इतरही आवडी-निवडी या क्लबने जोपासल्या आहेत. यात ट्रेकिंग, विविध कलागुणांचे सादरीकरण, कार्यक्रमांचे आयोजन, कोल्हापूरची खाद्य संस्कृती आदी गोष्टींचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर क्लबच्या माध्यमातून कोल्हापुरातील अनेक युवकांना कार्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे कोल्हापूर बॉईज फुटबॉल क्लबला बहुआयामी म्हणणे वावगे ठरणार नाही.

Back to top button