कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्यास कारणीभूत ठरणार्या अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.50 मीटरपर्यंत मर्यादित ठेवली जाईल, असा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांच्या बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी ही ऑनलाईन बैठक झाली.
सांगली पाटबंधारे (जलसंपदा) मंडळाच्या वतीने महापूर नियंत्रणाबाबत आज आंतरराज्य बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणाबाबत परस्परांत समन्वय साधला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली. कर्नाटकातील अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517 मीटरच्या पुढे गेल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका असतो. यामुळे पावसाळ्यात अलमट्टी धरणाची पाणी पातळी 517.50 मीटरपर्यंत नियंत्रित ठेवण्याबाबतबैठकीत चर्चा करण्यात आली.
अलमट्टीची पाणी पातळी नियंत्रित ठेवली जाईल. मात्र, आवश्यकता भासली आणि पाणी पातळी 517.50 मीटर पुढे वाढणार असेल, तर त्याबाबतची आगाऊ सूचना महाराष्ट्राला दिली जाईल. त्यानंतरच पाणी पातळी वाढवली जाईल. कोणतीही पूर्वसूचना दिल्याखेरीज पाणी पातळी वाढवली जाणार नाही, असे अलमट्टी धरणाच्या मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार, कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदींसह जलसंपदा विभागाचे दोन्ही राज्यांतील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, महापूर नियंत्रणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील संबंधित सर्व अधिकार्यांची पुढील आठवड्यात प्रशासकीय बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील कोल्हापूर व सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव व बागलकोट जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. मेअखेरपर्यंत ही बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.