Pune School News : पुण्यात अनधिकृत शाळा; 158 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, तिघांवर गुन्हा | पुढारी

Pune School News : पुण्यात अनधिकृत शाळा; 158 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, तिघांवर गुन्हा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शासनाची परवानगी न घेता पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करून 158 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढव्यातील ‘टीम्स तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल’च्या संस्थाचालक, मुख्याध्यापकासह तिघांच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संस्थाचालक उस्मान अत्तार, सचिव फिरोज खान व मुख्याध्यापक यांच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे महापालिका शिक्षण विभागातील सहायक प्रशासकीय अधिकारी शंकर रामचंद्र मांडावे (वय 50, मोरवाडी, पिंपरी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 6 ऑगस्ट 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम्स तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूलचे संस्थाचालक उस्मान अत्तार आणि इतरांनी शाळा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांची परवानगी घेतली नाही. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांची मान्यता न घेता सदर शाळेत पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करून 158 विद्यार्थांना प्रवेश दिला. उस्मान अत्तार यांनी सुरू केलेली शाळा अनधिकृत असल्याने शाळेकडे यू डायस नंबर नाही. त्यामुळे ही शाळा सरकाराच्या सरल पोर्टलवरसुद्धा नाही, त्यामुळे या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थांकडे सरल आयडी नाही.

हा आयडी नसल्याने विद्यार्थांना दुसर्‍या शाळेत अ‍ॅडमिशन मिळण्यात अडचण होत आहे. या शाळेकडून देण्यात शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र व इतर दाखले वैध व नियमानुसार नाहीत. संस्थाचालकांनी सरकराची परवानगी न घेता पालकांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे बोगस दाखले देऊन आर्थिक फसवणूक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

हेही वाचा

कोल्हापूर : प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेवून जीवन संपवले

पुण्यातील बुधवार पेठेत बांगलादेशी महिलांचा वेश्याव्यवसाय; 19 जणांवर कारवाई

अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड : फरारी महिला पुण्यातून अटकेत

Back to top button