

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्ह्यातील पांगरमल दारूकांड प्रकरणात फरार महिलेस राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) पुण्यातून अटक केली. भाग्यश्री गोविंद मोकाटे (रा. इमामपूर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मोकाटे आणि मंगला महादेव आव्हाड या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांनी 12 फेब—ुवारी 2017 रोजी पार्टी आयोजित केली होती. मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी मोकाटे आणि आव्हाड यांनी पांगरमल गावात पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीत विषारी दारू पिल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात 19 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. निवडणुकीत मोकाटे विजयी झाली होती. सहा वर्षे ती फरारी होती. न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. विशेष न्यायालयाने तिला वॉरंट बजावले होते. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला.
ती पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोकाटेला पकडले. सीआयडीचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत बुरडे, विशेष महानिरीक्षक संजय येनपुरे, पोलिस अधीक्षक पल्लवी बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद रावडे, हवालदार विकास कोळी, सुनील बनसोडे, उज्ज्वला डिंबळे, कदम आदींनी ही कारवाई केली. ती पुण्यातील खासगी कंपनीत सहा वर्षे काम करत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली.
हेही वाचा