अंजनवाडा शिवारात देशीदारुची बेकायदेशीर वाहतूक; ५.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

अंजनवाडा शिवारात देशीदारुची बेकायदेशीर वाहतूक; ५.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील देवाळा शिवारात थांबण्याचा इशारा करूनही पळ काढणाऱ्या वाहनास पोलिस अधिक्षकांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाठलाग करून अंजनवाडा शिवारात पकडले. पोलिसांनी 5.96 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, देवाळा शिवारातून एका वाहनामधून देशीदारूची बेकायदेशीर वाहतुक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्‍या माहितीवरून पोलिसांनी सांयकाळी पाच वाजल्या पासून देवाळा शिवारात वाहनाची तपासणी सुरु केली होती. दरम्यान, साडेपाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एका पिकअप वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता तेथून वाहनासह पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून अंजनवाडा शिवारात पिकअप पकडले.

वाहनाची तपासणी केली असता त्यात देशीदारुचे 25 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी चालक ऋषीकेश तुकाराम वाघमारे (रा. सावंगी, ता. औंढा) याच्याकडे विचारणा केली असता त्याने किशोर जैस्वाल (रा. सावंगी) याच्या सांगण्यावरून देशीदारू नेत असल्याचे सांगितले. तर दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे स्पष्ट केले.

देशीदारुचे बॉक्स व पिकअप असा 5.96 लाखांचा मुद्देमाल जप्त करून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात आणला आहे. या प्रकरणी जमादार अमित जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिकअप चालक ऋषीकेश वाघमारे, किशोर जैस्वाल यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

-हे ही वाचा 

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होणार एलिफंट सफारी

कोल्हापूर : अडीच महिन्यांत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस

मुंबई : सीजीएसटीच्या अधीक्षकाला पाच लाखांची लाच घेताना सीबीआयकडून अटक

Back to top button