अमोल कोल्हेंची धुळ्यात धडाडली तोफ, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल | पुढारी

अमोल कोल्हेंची धुळ्यात धडाडली तोफ, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- इंडिया महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेचे धुळ्यातील इंदिरा उद्यान येथे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला.

देशातील सुशिक्षित तरुणांना ऑनलाइन गेमच्या माध्यमातून उध्वस्त करण्याचे रॅकेट या देशात वाढले आहे. फ्युचर गेमिंग चालवणाऱ्या या कंपन्यांकडून 500 कोटींचे बॉण्ड घेऊन सुशिक्षित तरुणांचे भविष्य भारतीय जनता पार्टीचे नेते विकायला निघाले आहेत. त्यामुळे न खाऊगा न खाने दूंगा, अशी घोषणा देणाऱ्यांनी आता उत्तर दिले पाहिजे. जुगारांचे जाळे पसरायला तुम्ही मुभा दिली. याला जबाबदार कोण. याचा जाब आता जनतेने भारतीय जनता पार्टीला विचारलाच पाहिजे, असा सवाल आज राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी धुळ्यात विचारला आहे.

सभेला व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील, उमेदवार शोभा बच्छाव, माजी आमदार सुधीर तांबे, अश्विनी पाटील, प्रतिभा शिंदे, माजी आ. शरद पाटील, प्रथम महापौर भगवान करनकाळ, युवराज करनकाळ, महेश मिस्तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष रणजित भोसले, डॉ.दरबारसिंग गिरासे, डॉ.अनिल भामरे, आपचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे,निवृत्त न्यायाधीश जे.टी.देसले, डाॅ.सुशिल महाजन, नगरसेवक प्रफुल्ल पाटील, राजेंद्र खैरनार, धिरज पाटील,अरूण पाटील, हेमाताई हेमाडे, प्रशांत भदाणे, आदी उपस्थित होते.

केंद्रातल्या सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत आणले

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशी घोषणा देताना नवचैतन्य येते. छत्रपती ही व्यक्ती नसून एक विचार आहे. शेतकऱ्यांच्या पिकाच्या एका देठाला देखील हात लावू नका, असा आदेश महाराजांनी दिला. पण केंद्रातल्या सरकारने कांदा निर्यात बंदी, कापूस व सोयाबीनचे भाव पाडून शेतकऱ्यांना अडचणीत आणले . महिलेची बेअदबी करणाऱ्या पाटलाचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी चौरंगा केला. पण क्रीडा क्षेत्रातल्या लेकींचे शोषण करणाऱ्यांवर कारवाई न करता त्यांनाच दिल्लीच्या रस्त्यावरून खेचत नेऊन कारवाई करणारे केंद्रातले सरकार आणि त्यांची पाठराखण करणारे महाराष्ट्रातले फुटी यांच्यासोबत गेलो असतो तर छत्रपती शिवाजी महाराजांची तसेच छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करताना कवड्याच्या माळेला हात लावतानाही हात थरथरेल, असा विचार मनात आला. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जपण्यासाठी आपण शेतकरी आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची पाठ राखण करणे पसंत केले नाही, असा टोला देखील कोल्हे यांनी लावला.

केंद्रातल्या सरकारने दोन पक्ष फोडले

उत्तर भारतात गंगा यमुनेच्या मऊ मातीत वावरणाऱ्यांना सह्याद्रीच्या राकट पाषाणाची ओळख नाही. उत्तरेत प्रभू श्रीरामचंद्र आहे. मात्र दख्खनमध्ये मंदिरातला देव, गोठ्यातली गाय आणि घरातली माय सुरक्षित ठेवणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हा वारसा आम्ही जपतो आहे. केंद्रातल्या सरकारने दोन पक्ष फोडले. सर्वसामान्य शेतकऱ्याला आत्मभान देण्याचे काम करणारे हिंदुह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पिचलेल्या शेतकऱ्याला स्वाभिमान देणारे शरद पवार यांचे पक्ष फोडले. महाराष्ट्रातून गुजरात मध्ये अनेक उद्योगधंदे पळवले गेले. अशा वेळी या महायुतीचे 200 आमदार विधानसभेमध्ये असताना त्यांनी एक शब्दही काढला नाही. या महाराष्ट्रात महापुरुषांचा अपमान झाला. त्यावेळी देखील महायुतीचे आमदार बोलले नाही. हे प्रश्न त्यांना विचारावेच लागतील. कांदा, कापूस ,सोयाबीन याविषयी मी संसदेत बोललो. त्यावेळी महाराष्ट्रातल्या महायुतीचे 39 खासदार होते. पण यापैकी एकही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू शकले नाही. केंद्रातील सरकारने सातत्याने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे खच्चीकरण करणे सुरू केलेले आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीपतीच्या समोर स्वाभिमान जागरूक ठेवल्याचे उदाहरण आहे. औरंगजेबाचे 80 पट राज्य असताना त्यांनी महाराजांना दख्खनची सुभेदारी देऊ केली. ही सुभेदारी घेऊन महाराजांना आर्थिक लाभ झाले असते. पण त्यांनी स्वाभिमान जागृत ठेवला. त्यांनी ही सुबेदारी स्वीकारली असती तर आज साडेतीनशे वर्षानंतर देखील आपण त्यांच्या नावाने जय म्हटले नसते. हा स्वाभिमान आणि छत्रपतींचा विचार आपल्याला काळजात रुजवावा लागेल. फक्त जय म्हणून चालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले.

देशाची अर्थव्यवस्था भविष्यात धोकेदायक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता भाषणाची पद्धत बदलली आहे. गेल्या 70 वर्षात काँग्रेसने काय केले, असे मोदी नेहमी सांगतात. यावेळी ते कोरोना लसीचा उल्लेख करतात. मात्र या 70 वर्षात काँग्रेसने पोलिओ पासून बीसीजी पर्यंतच्या सर्व लसी दिल्या. काँग्रेसने त्याचे भांडवल केले नाही. आज भाजपाकडून विकासाची स्वप्न दाखवले जातात. गेल्या 70 वर्षात देशाच्या कारभार करताना काँग्रेसचे कर्ज 54 लाख कोटी होते. पण या दहा वर्षात हे कर्ज 205 लाख करोड पर्यंत जाऊन पोहोचले. दीडशे लाख कोटी कर्ज या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने वाढवले. म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळावर देखील दीड लाखाचे कर्ज राहील. देशाला कर्जबाजारी करणारे हे नेते जीडीपी बद्दल देखील चुकीची माहिती देतात. या देशावर उत्पादनाच्या तुलनेत 81 टक्के कर्ज आहे. त्यामुळेच या देशाची अर्थव्यवस्था भविष्यात धोकेदायक पद्धतीत असल्याचे या देशाच्या अर्थमंत्री चे पती यांनी सांगितले आहे.

श्रद्धेने महागाई कमी होणार नाही

देव आपला देखील आहे. यात कुणाचीही मक्तेदारी नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धा बाळगणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. पण या श्रद्धेने महागाई कमी होणार नाही. तर बेरोजगारी देखील दूर होणार नाही. त्यामुळे पोकळ घोषणांचा काहीही उपयोग होणार नाही. हे त्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आज आली आहे. तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात कमी असलेली टक्केवारी पाहून काही लोक कोल्हे यांच्या मनात धाकधूक असल्याचे सांगतात. पण माझ्या मनात धाकधूक नसून मला विजयाची खात्री आहे. पण कमी झालेले मतदान कुणाचे याचा विचार झाला पाहिजे. 2014 मध्ये 18 ते 22 वर्षाच्या नव मतदारांना क्रांतीचे स्वप्न दाखवले गेले. जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनामुळे हा मतदार प्रभावित झाला होता .त्यामुळे त्यांनी घाईघाईने मतदान केले. पण 2024 मध्ये हा मतदार 28 ते 32 वर्षाचा झाला .त्याला यापूर्वीच्या दहा वर्षांमध्ये फसगत झाल्याचे कळाले. रोजगार मिळाला नाही आणि स्मार्ट सिटी देखील झाली नाही. त्यामुळे हा तरुण आता समंजस झाला असून तो आता विचार करूनच मतदान करेल, असा विश्वास देखील यावेळी कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Back to top button