नांदेड: लालवंडी येथे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा | पुढारी

नांदेड: लालवंडी येथे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा

नायगाव: पुढारी वृत्तसेवा: लालवंडी (ता.नायगाव) येथे महाप्रसादातून विषबाधा झालेल्या बाधित रुग्णांची प्रकृती आज (दि.१७) स्थिर असून सुधारणा होऊ लागली आहे. नायगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सोनकांबळे व त्यांचे सहकारी रुग्णांवर उपचार करत आहेत. काही रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे १५ मेरोजी महाप्रसाद कार्यक्रमात आंबलीचे जेवण केलेल्या १३० जणांची प्रकृती बुधवारी रात्री बिघडली होती. त्यांना मध्यरात्री नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अत्यवस्थ रुग्णांना नांदेड येथे पाठविण्यात आले होते. नव्याने रुग्णाची संख्या वाढत असताना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक सोनकांबळे यांनी प्रसंगावधान दाखवत व वरिष्ठांशी संवाद साधून नव्याने बांधण्यात आलेल्या कोव्हिड सेंटर नायगाव येथे व ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन रूम्स व वार्ड मध्ये सर्व रुग्ण ऍडमिट करून उपचार केले. जवळपास ७५ टके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

इतर रुग्णावर उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत सोनकांबळे यांनी दिली. रुग्णांनी बाहेरचे पदार्थ खाणे, थंड पाणी पिणे टाळणे अवश्यक आहे. रुग्णांनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. डॉ. बिरादार, डॉ. चौधरी, डॉ कोंपलवाड रूग्णांवर उपचार करत आहेत.

तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची भेट

तहसीलदार डॉ. धमप्रिया गायकवाड व गटविकास अधिकारी एल. आर. वांझे यांनी रुग्णालयात येऊन रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आवश्यक त्या सूचना दिल्या.

हेही वाचा

Back to top button