कोल्हापूर : अडीच महिन्यांत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस | पुढारी

कोल्हापूर : अडीच महिन्यांत सरासरीच्या केवळ ४५ टक्केच पाऊस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या अडीच महिन्यांत सरासरीच्या केवळ 45 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे चार महिन्यांची वार्षिक सरासरी गाठण्यास उर्वरित दीड महिन्यात तब्बल 55 टक्के पावसाची गरज आहे. यामुळे यंदाही पाऊस वार्षिक सरासरी गाठेल का? याबाबत साशंकताच असून, प्रशासनाची चिंताही कायम आहे.

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिराच झाले. जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यात काहीसा चांगला पाऊस झाला. या पावसाने जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. मात्र, ती गंभीर झाली नाही. दरम्यान, पावसाचाही जोर कमी झाला, तो अद्याप तसाच आहे.

जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पडणार्‍या पावसापैकी केवळ 66.3 टक्केच पाऊस झाला. 1 ऑगस्ट ते दि. 18 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी 282.1 मि.मी. पाऊस पडतो. या कालावधीत जिल्ह्यात 96.3 मि.मी. इतकाच म्हणजे 34.1 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एक जून ते 18 ऑगस्ट या कालावधीत 1,330.5 मि.मी. इतका पाऊस होतो, यावर्षी तो 791.3 मि.मी. म्हणजे 59.5 टक्के पाऊस झाला आहे.

सर्वाधिक पाऊस पडणार्‍या तालुक्यांवरही यावर्षी पाऊस रुसलेलाच आहे. राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, चंदगड या तालुक्यांत तर 70 टक्क्यांपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. जिल्ह्यात केवळ भुदरगड आणि कागल या दोनच तालुक्यांत 18 ऑगस्टपर्यंत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत 100 टक्क्यांपेक्षा जादा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील पावसाची स्थिती

1,733.1 मि.मी. : पावसाची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर)
791.3 मि.मी. : 1 जून ते 18 ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस
45.65 टक्के : वार्षिक सरासरीच्या तुलनेत आजअखेरचा पाऊस
59.5 टक्के : 1 जून ते 18 ऑगस्टपर्यंतच्या तुलनेत यावर्षीचा पाऊस
76.7 टक्के : गतवर्षी याच कालावधीत झालेला पाऊस

प्रमुख धरणांपैकी एकच पूर्ण क्षमतेने भरले

यावर्षी आजअखेर जिल्ह्यातील वारणा, दूधगंगा, राधानगरी, पाटगाव आणि तुळशी या प्रमुख पाच धरणांपैकी राधानगरी हे एकच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. दरम्यान, गुरुवारी (दि. 18) राधानगरी 96.16 टक्के भरले होते. वारणा 87.56 टक्के, दूधगंगा 84.61 टक्के, पाटगाव 92.77 टक्के, तर तुळशी धरण 78.82 टक्के भरले आहे.

Back to top button