नायर टोळीच्या गुंडाने जेलमधून उकळली खंडणी; व्यावसायिकाला धमकावले | पुढारी

नायर टोळीच्या गुंडाने जेलमधून उकळली खंडणी; व्यावसायिकाला धमकावले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कुख्यात बापू नायर टोळीतील गुंड तबरेज सुतार याने थेट कारागृहातून खंडणी उकळली असल्याचा प्रकार उघड झाला आहे. यासाठी त्याने कारागृहातून 14 मोबाईल क्रमांकांचा वापर करून एका तरुण व्यावसायिकाला धमकावले. त्याच्याकडे आणखी 30 लाखांची खंडणीची मागणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खंडणीविरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सागर धुमाळ आणि अविनाश मोरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. 34 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तबरेजवर तीन खुनाच्या गुन्ह्यांसह विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नागपूर कारागृहात आहे.

कोल्हापूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना, त्याने 14 फोन नंबरचा वापर करून फिर्यादी यांच्याकडून दहा लाखांची खंडणी उकळली. फोनवर खुनाची धमकी देण्यात आली होती. तसेच काही गुंड प्रत्यक्षात घरी पाठवून दमही देण्यात आला होता. भीतीपोटी दहा लाखांची खंडणी दिल्यानंतरही तबरेजने आणखी 30 लाखांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास तीन गुंठे जागा नावावर करून देण्यास सांगण्यात आले होते. नकार दिल्यावर तबरेजने गुंड पाठवून धमकावणे सुरू होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकडवे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव यांच्या पथकाने दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांकडे सोपवून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.

काय आहे प्रकरण…

फिर्यादी व्यावसायिक हे पूर्वी तबरेज सुतारच्या चारचाकी वाहनावर 2012 पासून चालक म्हणून काम करत होता. दरम्यान, 2017 मध्ये एका गुन्ह्यात तबरेज फरार झाला. यानंतर फिर्यादीने नोकरी सोडून जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू करत त्यात जम बसवला. तबरेजने फिर्यादीकडे दहा लाखांची खंडणी मागितली. तीन लाख उकळलेही. मात्र 2022 मध्ये तबरेजला एका खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली. यानंतरही तबरेजने कारागृहातून फोन करून उर्वरित रकमेसाठी फिर्यादीला दमदाटी करत उरलेले सात लाख साथीदारांकरवी उकळले. मात्र, तबरेजने आणखी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केल्यावर फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाकडे धाव घेतली.

कोणी अशाप्रकारे व्यावसायिकांना धमकावून खंडणीची मागणी करीत असेल तर पोलिस त्यांचा कडक बंदोबस्त करतील. नागरिक, व्यावसायिक यांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी. पोलिस तत्काळ दखल घेतील.

– अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर

हेही वाचा

Back to top button