कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होणार एलिफंट सफारी | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होणार एलिफंट सफारी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राज्यातील कोल्हापूर – सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेलगत साडेचार हजार हेक्टरवर एलिफंट सफारी प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.

यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात 1972 नंतर अनेक ठिकाणी व्याघ्र प्रकल्प सुरू झाले. मात्र, हत्तींच्याबाबत ठोस योजना राबवल्या नाहीत. व्याघ्र प्रकल्पांमध्ये पर्यटकांना टायगर सफारी घडवण्यात येते. आता राज्यात हत्तींची संख्या वाढत असल्याने दोन ठिकाणी एलिफंट सफारी सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यामध्ये जंगली हत्तींच्या आक्रमणामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून अनेक घरांची पडझड होत आहे. मनुष्यहानी होण्याचे प्रकार घडत असल्यामुळे राज्य सरकारने हत्तींचे आक्रमण झाल्यास भरपाई देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. भरपाईमध्ये वाढ करतानाच पिके आणि घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. यापुढे यासंदर्भातील संपूर्ण नुकसान भरून देण्याबाबतही सरकार विचार करीत असल्याचे ते म्हणाले.

हत्तींच्या संख्येत वाढ

राज्यामध्ये हत्तींची संख्या वाढत आहे. सध्या चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये 22 हत्ती आढळले आहेत. कर्नाटकमधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर हत्ती दाखल झाले आहेत. हत्तींना योग्य आणि सुरक्षित वातावरण मिळत असल्याने त्यांनी या भागात ठाण मांडले आहे. आता मनुष्य आणि हत्ती यांचा संघर्ष टाळून त्यांच्या अधिवासामध्ये सुरक्षितता देण्याबाबत सरकार विचार करीत आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.

जिल्ह्यात पाच हत्तींचा वावर

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून आजरा, चंदगड, गडहिंग्लज तसेच भुदरगड आणि राधानगरी तालुक्यांत हत्तींचा वावर आहे. चंदगड, आजरा परिसरात 2006 मध्ये सुळेधारी हत्तींचा वावर होता. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड या तीन तालुक्यांत तर पाच हत्तींचा वावर आहे.

Back to top button