हिंगोली : ‘पीएम किसान’ योजनेपासून औंढा तालुक्यातील असंख्य शेतकरी वंचित | पुढारी

हिंगोली : 'पीएम किसान' योजनेपासून औंढा तालुक्यातील असंख्य शेतकरी वंचित

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील हजारो शेतकरी अद्याप पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना आजपर्यंत या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही. अंजनवाडा, येळेगाव, पिपळा, ब्राह्मणवाडा, सिद्धेश्वर, सुरेगाव, सावंगी बाजार, नांदगाव यासह तालुक्यात १०२२ गाव आहेत; यातील प्रत्येक गावातील १० ते १५ शेतकरी योजनेपासून वंचित आहेत.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीएम किसान सन्मान योजना सुरू केली. परंतु शेतकरी या योजनेपासून अजूनही वंचित आहेत. तहसील कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करूनही अजून अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळत नाही. तालुक्यातील पीएम किसान योजने पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महसूल व कृषी विभागाने पुढाकार घ्यावा आणि तात्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात आहे. तलाठी, कृषी सहायक किंवा तहसीलदार यातील कोणीही लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील असंख्य खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा सन्मान निधी अजूनही मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयात कित्येक चकरा मारल्या. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी शासनाकडून एक सार्वजनिक ठिकाणी शिबिर घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडाव्यात. शेतकऱ्यांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योजनेचा फायदा मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button