मंचर : बसअभावी विद्यार्थी, प्रवाशांचे हाल | पुढारी

मंचर : बसअभावी विद्यार्थी, प्रवाशांचे हाल

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जेजुरी (ता. पुरंदर) येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगाराच्या गाड्या लाभार्थ्यांना घेऊन गेल्या. परिणामी सोमवारी (दि. 7) आंबेगाव तालुक्यात प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटी बस न मिळाल्यामुळे घरी परतावे लागले.

आंबेगाव तालुक्यात एसटीचे आगार नसल्यामुळे येथील प्रवाशांच्या वाहतुकीची जबाबदारी राजगुरुनगर आणि नारायणगाव एसटी आगारावर आहे. ’शासन आपल्या दारी’ या जेजुरी येथील शासकीय कार्यक्रमासाठी नारायणगाव एसटी आगाराच्या 45 आणि राजगुरुनगर एसटी आगाराच्या 32 बसगाड्या खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांतून लाभार्थ्यांना घेऊन जेजुरी येथे सोमवारी सकाळी रवाना झाल्या. त्यामुळे स्थानिक गावांसाठी जाणार्‍या एसटीच्या लोकल फेर्‍या रद्द झाल्या.

विशेषतः घोडेगाव, मंचर, अवसरी ,निरगुडसर, पारगाव कारखाना, पिंपळगाव, रांजणी, कुरवंडी, महाळुंगे पडवळ, साकोरे, लोणी, धामणी, वडगाव पीर इत्यादी 25 गावांमधील मार्गावर धावणार्‍या एसटी बस न आल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले. सोमवारी सकाळी विद्यार्थी आणि प्रवासी मंचर किंवा घोडेगाव येथे जाण्यासाठी एसटी बसची वाट पाहत होते. परंतु एसटी बस न आल्यामुळे अनेक विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात न जाता घरी परतले.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी राजगुरुनगर एसटी आगाराच्या 32 एसटी गाड्या सोमवारी सकाळीच गेल्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. एसटी गाड्यांची संख्या अपुरी असल्यामुळे आणि पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हा प्रकार घडला आहे. याबाबत त्यांनी खेद व्यक्त करून प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

– पल्लवी पाटील, आगारप्रमुख, राजगुरुनगर एसटी आगार

हेही वाचा

गराडे धरण 100 टक्के भरले कर्‍हेत विसर्ग सुरू

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

जुनी सांगवीतील सोसायट्या समस्यांच्या विळख्यात

Back to top button