गराडे धरण 100 टक्के भरले कर्‍हेत विसर्ग सुरू | पुढारी

गराडे धरण 100 टक्के भरले कर्‍हेत विसर्ग सुरू

सासवड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सासवड शहराला पाणीपुरवठा होत असलेले 65.37 दशलक्ष घनफूट क्षमतेचे गराडे धरण असून, 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सासवड शहर व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. सध्या धरणातून कर्‍हा नदी तसेच पश्चिम भागातील सर्व बंधार्‍यांत विसर्ग सुरू आहे. ते भरल्यानंतर नाझरे धरणाकडे विसर्ग चालू होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड यांनी दिली.

कर्‍हा नदीवरील गराडे धरणातून सासवड शहरासह गराडे गावासह कोडीत खुर्द व बुद्रुक, चांबळी व हिवरे आदी गावांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी परिसरात संततधार पावसामुळे पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे कर्‍हा नदी प्रवाहित होत गराडे धरण 100 टक्के भरले आहे.

दुसरीकडे परिसरातील पाझर तलाव, बंधारे, विहिरी पूर्व भरून वाहू लागले आहेत. या पाण्यामुळे या परिसरातील राहणार्‍या नागरिकांचा तसेच गुरे-ढोरे, बकर्‍या, वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, सासवड शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे, असे नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता संकेत नंदवंशी यांनी सांगितले.

सोमवार (दि. 7) अखेर सासवड परिसरात 3 मिलिमीटर, जेजुरी 2 मिलिमीटर, भिवडी 2 मिलिमीटर, परिंचे 1 मिलिमीटर इतका पाऊस पडला. तर राजेवाडी, वाल्हे, कुंभारवळण हद्दीत पावसाची नोंद झाली नाही, असे पुरंदर तहसील कार्यालयातील लिपिक विनोद साबळे यांनी सांगितले.

हेही वाचा

कुंडेश्वर डोंगरावर रानफुलांचा बहर

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे

जुनी सांगवीतील सोसायट्या समस्यांच्या विळख्यात

Back to top button