जुनी सांगवीतील सोसायट्या समस्यांच्या विळख्यात | पुढारी

जुनी सांगवीतील सोसायट्या समस्यांच्या विळख्यात

नवी सांगवी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जुनी सांगवी परिसरातील अनेक सोसायट्या समस्यांच्या विळख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांमधील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेची रीतसर परवानगी घेऊन बांधकाम केलेल्या अधिकृत सोसायट्या परिसरात आहेत. या सोसायटीमध्ये साधारणपणे 40 पेक्षा जास्त कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. मात्र, येथील नागरिकांना दिवसेंदिवस नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यांची दुरवस्था

या सोसायट्यांच्या समोर व बाळासाहेब शितोळे मार्केटच्यामागे असणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. येथील सोसायटीसमोरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे दिसून येत आहे. रस्ता आणि डांबरीकरण असल्याचे दिसूनच येत नाही. दुतर्फा बाजूस रस्त्याला लागून झाडेझुडपे व गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या झाडाझुडपांमुळे रस्ता अरुंद झाला आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

सुरुवातीला चेंबर तुटल्याने या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. येथील रस्त्यावर पावसाळ्यामुळे डबकी तयार होत आहेत. संपूर्ण रस्ताच चिखलमय झाला आहे, त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन येथील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागले आहे. येथील नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून सदनिका खरेदी केली. मात्र, आपण नेमके झोपडपट्टीत राहतो की काय? असे प्रश्न येथील नागरिकांमध्ये उद्भवत आहेत.

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

सोसायटीत राहणार्‍या नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सांगवीमध्ये इतरत्र रस्ते, ड्रेनेजलाईन, आरोग्य आदी विकासाची, देखभाल, दुरुस्ती आदी कामे केली जातात. मात्र, मग इथे राहत असलेल्या सोसायटीधारकांच्या येण्या-जाण्यासाठी असणार्‍या रस्त्याचे काम का होत नाही, असा संतप्त सवाल येथील सदनिकाधारक करीत आहेत.

दिवसेंदिवस येथील रस्त्याला लागून अनधिकृतपणे अतिक्रमणे होत असल्यामुळे महापालिकेच्या अखत्यारीत असणारा रस्ता दोन ते अडीच मीटरच राहिल्याचे येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. वेळोवेळी पालिकेचा कर भरूनही नागरिकांना रस्ता, वीज, ड्रेनेज यासारख्या समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे.

येथील रस्त्याचे गेली अनेक वर्षे डांबरीकरण झालेले नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून पाण्याची डबकी तयार होत आहेत. दिवसेंदिवस येथील रस्ता अरुंद होत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे वाहन येऊ शकत नाहीत. सोसायटीत राहणार्‍या बर्‍याच कुटुंबीयांनी इतर ठिकाणी आपले स्थलांतर केल्याचेदेखील येथील नागरिकांनी सांगितले.

– एक नागरिक

हेही वाचा

पवन मावळात दोन हजार हेक्टरवर भात लागवड

अहमदनगर : मनपासाठी मनुष्यबळाचा मार्ग मोकळा

 

Back to top button