तिकडे धोंडे जेवणाला गेले अन् इकडे 30 तोळे सोने पळविले! | पुढारी

तिकडे धोंडे जेवणाला गेले अन् इकडे 30 तोळे सोने पळविले!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धोंडे जेवण एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्यांनी बंगल्याचे कुलूप तोडून तब्बल 30 तोळे सोन्याचे दागिने, चांदी आणि 25 हजार रुपयांची रोकड, असा 14 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. ही घटना संदेश सोसायटी, सरस्वती बंगला, मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी (दि. 3) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. याप्रकरणी माहेन गाडगीळ (वय 67) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडगीळ हे व्यावसायिक आहेत. पूर्वी त्यांचा दुधाचा व्यवसाय होता. गाडगीळ आणि त्यांच्या पत्नी बंगल्यात राहतात. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता ते सोमवार पेठेतील आपल्या नातेवाइकांच्या घरी धोंडे जेवणासाठी गेले होते. त्यामुळे बंगला कुलूपबंद होता. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी साडेचारच्या सुमारास बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर रोकड, सोने-चांदीचे दागिने असा 14 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पोबारा केला.

दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास गाडगीळ दाम्पत्य घरी परतले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मार्केट यार्ड पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करीत आहेत.

वाईन शॉपचे शटर उचकटून रोकड लंपास

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील न्यू जानू वाईन शॉपचे शटर उचकटून चोरट्यांनी 1 लाख 82 हजार रुपयांची रोकड चोरी केली. याप्रकरणी आशिष बच्चल (वय 40, रा. कोरेगाव पार्क) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 3 ते 4 ऑगस्टच्या कालावधीत घडली.

हेही वाचा

एमपीएससी करणार्‍या तरुणाने मागितली दहा लाखांची खंडणी

गावे बहरणार, हिरवाईने नटणार

नांदेड : चाकूचा धाक दाखवून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लुटले

Back to top button