गावे बहरणार, हिरवाईने नटणार | पुढारी

गावे बहरणार, हिरवाईने नटणार

विकास कांबळे

कोल्हापूर : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रत्येक गावामध्ये वृक्षारोपण करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याला ग्रामपंचायतींकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून, केवळ महिनाभरात सात लाख झाडे ग्रामपंचायतींनी लावली आहेत.

हिरवे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. त्याचे परिणाम पर्यावरणावर दिसू लागले आहेत. सध्या जिल्ह्यात काही गावांमध्ये नवीन महामार्गांचे काम सरू होत आहे, तर काही महामार्गांचे विस्तारीकरण सुरू आहे. नवीन महामार्गांचे काम सुरू असलेल्या मार्गावरील झाडे तोडण्यात येत आहेत. तोडण्यात येणार्‍या झाडांमध्ये काही गावांमधील शंभर वषार्र्ंपूर्वीच्या झाडांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने वन विभागाच्या मदतीने संपूर्ण जिल्ह्यात झाडे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.

जिल्ह्यात दहा लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. त्यासाठी झाडे उपलब्ध करून देण्याचे वन विभागाने मान्य केले आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतींच्या वतीने झाडे लावण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास दीड हजार गावांमध्ये 6 लाख 93 हजार 570 झाडे ग्रामपंचायतींच्या वतीने लावण्यात आली आहेत. यामध्ये हातकणंगले तालुक्याला दिलेले 60 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उद्दिष्टापेक्षा या तालुक्याने साडेतीन हजार हजार झाडे जादा लावली आहेत.

तालुकानिहाय लावलेल्या झाडांची संख्या

हातकणंगले  63,450
आजरा        66,400
भुदरगड     84,640
पन्हाळा      95,875
चंदगड       87,340
गगनबावडा 20,970
करवीर       74,635
शाहूवाडी    63,955
शिरोळ      27,150
गडहिंग्लज  42,015
कागल       34,750
राधानगरी  32,390

Back to top button