एमपीएससी करणार्‍या तरुणाने मागितली दहा लाखांची खंडणी | पुढारी

एमपीएससी करणार्‍या तरुणाने मागितली दहा लाखांची खंडणी

पुणे; पुढारी वृत्तेसवा : व्यावसायिकाच्या कारवर चिठ्ठी चिकटवून दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या तरुणाला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने वेळापूर (अकलूज) येथून अटक केली. श्रीनाथ यलाप्पा शेडगे (वय 25, रा. उंबरे (वेळापूर) अकलूज) असे त्याचे नाव आहे. शेडगे हा एमपीएससीची (स्पर्धा परीक्षा) तयारी करीत आहे. कर्जबाजारी झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. आलिशान गाडी पाहून त्याने चिठ्ठी चिकटवली होती.

कोरेगाव पार्क येथील हॉटेलमध्ये जेवण करून घरी निघण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आलेल्या व्यावसायिकाच्या कारवर 10 लाखांच्या खंडणीसाठी चिठ्ठी चिकटविल्याचा प्रकार समोर आला होता. दहा लाख न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फिर्यादी हे त्यांच्या मित्रासोबत 31 जुलैला रात्री साडेआठला कोरेगाव पार्क येथील लेन नंबर 7 वर डेझर्ट वॉटर हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांची कार हॉटेलच्या बाहेरील बाजूला पार्क केली होती. हॉटेलमध्ये जेवण करून रात्री सव्वाबाराला बाहेर पडल्यानंतर गाडीजवळ गेल्यावर त्यांना त्यांच्या कारच्या दरवाजाला एक पांढरे बंद पाकीट चिकटविल्याचे दिसले. त्यानी ते बंद पाकीट उघडून पाहिले असता, त्यामध्ये त्यांना हिंदी मजकुराची चिठ्ठी सापडली. त्यामध्ये ’मला दहा लाखांची गरज आहे. मला पैसे दिले नाही, पोलिसांना सांगितले तर तुझ्या कुटुंबातील एकेका व्यक्तीला मारून टाकेन,’ अशी धमकी देण्यात आली.

’तुम्हाला जर विश्वास नसेल तर परवापासून आम्ही तुमच्या मृत्यूची वाट पाहू. पैसे देताना आमचा एक जरी माणूस पकडला गेला तर आमची पन्नास लोक आहेत, त्यामुळे तुझ्या कुटुंबातील एकही माणूस जिवंत राहणार नाही, तुझ्या एका चुकीची शिक्षा ही मृत्यू आहे. त्यामुळे आम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा, पैसे दिल्यावर तू तुझ्या वाटेला, आम्ही आमच्या वाटेला,’ असे त्यात म्हटले होते. परंतु, फिर्यादी यांनी संबंधित नंबरवर दोन ते तीन वेळा फोन केले परंतु, समोरील व्यक्तीने त्यांचे फोन उचलले नाहीत. त्यानंतर ते घरी गेले.

सकाळी दहा वाजता फिर्यादी जेजुरी येथे गेले व मित्र पंकजबरोबर असताना दुपारी अडीच वाजता पंकज यांच्या मोबाईलवर फोन आला. तसेच पैशाची मागणी करण्यात आली. तुझा व तुझ्या कुटुंबीयांचा जीव वाचवायचा असेल तर तू कोरेगाव पार्क येथे जेवणाच्या डब्यात दहा लाख रुपये घेऊन ये. ते कोठे आणायचे, कसे आणायचे ते मी सांगतो,’ अशी धमकी दिली. दरम्यान या प्रकारानंतर तक्रारदारांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली होती.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन कांबळे, पोलिस कर्मचारी गजानन सोनुने, अमोल सरडे,
पुष्पेंद्र चव्हाण, उत्तम तारू, निखील जाधव, नागनाथ राख यांच्या पथकाने केली आहे.

असा सापडला जाळ्यात…

शेडगेने फिर्यादींकडे खंडणीची मागणी करण्यासाठी एका व्यक्तीच्या नावावर सीम कार्ड घेतले. ती व्यक्ती मजूर अड्ड्यावर काम करते. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने शेडगेने त्याचा परिचय करून घेतला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांच्या हाती तोच धागा लागला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता त्या मजुराचे नाव पोलिसांना मिळाले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने शेडगे याला आपल्या नावावर सिम कार्ड घेऊन दिल्याचे सांगितले. शेडगे याने सिम कार्डचे पैसे देताना ऑनलाइन दिले होते. त्यावरून पोलिसांनी त्याचे नाव आणि पत्ता सोधून काढला. त्या वेळी तो वेळापूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मालिका पाहून आरोपीचे कृत्य

शेडगे याचे आई-वडील गावी शेती करतात. मागील आठ महिन्यांपूर्वी तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला. कर्जबाजारी झाल्याने त्याने झोमॅटोमध्ये काम सुरू केले होते. या वेळी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर त्याला नुकसान झाले होते. त्यामुळे त्याने सीआयडी मालिका पाहून पोलिस तपासाची दिशा पाहत मजूर अड्ड्यावरील एका मजुराकडून सिम कार्ड घेऊन त्याचा गुन्ह्यासाठी नाव बदलून वापर केला.

Back to top button