पुणे : जगताप-सोनवणे नात्यात वाळूने घातला रक्ताचा सडा | पुढारी

पुणे : जगताप-सोनवणे नात्यात वाळूने घातला रक्ताचा सडा

यवत; दीपक देशमुख

22 ऑक्टोबर2021 ला हवेली तालुक्यातील उरुळी कांचन मध्ये भरदिवसा राहू गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष जगताप याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांनतर लोणी काळभोर पोलिसांनी तपास यंत्रणा वापरून या हत्येमागे राहूमधील उमेश सोनवणे याचा हात असल्याचे उघडकीस आणत उमेश सोनवणेला अटक केली.

उमेश सोनवणेच्या अटकेनंतर संतोष जगतापच्या हत्येला राहू गोळीबार प्रकरण कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. राहू गोळीबार हा वाळूच्या वादातून झाला. एकेकाळी गावात एकत्र राजकारण करणारे सोनवणे आणि जगताप यांच्या नात्यात वाळूने अक्षरशः रक्ताचा सडा घातला आहे. दोन घरातील तीन नवं युवकांचे जीव घेऊन तरी आत्ता तरी वाळू शांत बसेल का? असा प्रश्न आता दौंडकरांना पडला आहे.

2010 पर्यंत सधन आणि मातब्बर कुटूंब म्हणून ओळख असणारे जगताप आणि सोनवणे कुटूंब आता गुंडगिरीमुळे ओळखले जाऊ लागले आहे. वाळू आणि सुडाची भावना या गुंडगिरीला कारणीभूत ठरली आहे.

नदीतील काळ सोनं अधिक आकर्षित करू लागले

नदीच्या सपाट आणि सुपीक भागात दोन आकडी सातबारा हिरवागार ऊस त्यातून मिळणारे लाखो रुपये यापेक्षा सोनवणे आणि जगताप यांना याच नदीतील काळ सोनं अधिक आकर्षित करू लागले. राहू गावाजवळील खामगावमध्ये 2010 च्या सुमारास सुरू होणारा वाळूचा ठेका गुंड अप्पा लोंढे याच्या समर्थकांनी घेतला आणि तालमीतून आलेल्या संतोष जगतापला लाल मातीऐवजी नदीतील वाळू सर्वस्व वाटू लागली. यातून आपण ऊस शेतीपेक्षा जास्त पैसे कमवू शकतो अस त्याला वाटू लागलं.

अप्पा लोंढेचा संपर्क आला आणि आता आपल्या बरोबर लोंढे नावाचा भाई आहे आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही अशा फुगिरीत तो राहू लागला.दुसरीकडे तुलनेने गावात आपण जास्त आहोत इतक्या दिवस आम्ही ह्या ठिकाणी वाळू काढली आहे. लिलाव झाला असला म्हणून काय झालं? लोंढे नि त्याचे पैसे घेऊन बाजूला व्हावं ह्या भागातील वाळूवर आमचा हक्क आहे. लोंढे या ठिकाणी येऊन वाळू काढू शकत नाही अशी दहशत सोनवणे यांनी करायला सुरूवात केली.

यापूर्वी लोंढेने या भागात आपल्या नातेवाईकांच्या मदतीने वाळू काढली होती. वाद केले होते आणि मिटवले पण होते. आता सोनवणे आडवे येत असतील तर जगतापना पुढं करायचं तंत्र त्याने अवलंबले आणि 10 नोव्हेंबर2011 रोजी जगताप आणि सोनवणे गटात किरकोळ मारामारी झाली, पण ही मारामारी झाली नव्हती तर वाळूने आणि लोंढेनी घडवून आणली होती.

आणि संतोष जगतापचा आत्मविश्वास दुणावला.

सोनवणेचा काटा काढायचा असेल तर जगताप हा चांगला मोहरा आहे असं अप्पा लोंढेनी हेरलं आणि तू सोनवणे ना नड सगळी ताकद देतो अस अप्पा लोंढेनी संतोष जगतापला भरवलं. दुसऱ्या दिवशी 26 नोव्हेंबर 2011 ला संतोष जगतापला लोंढेनी 50 हून अधिक पोरांची रसद पुरवली आणि संतोष जगतापचा आत्मविश्वास दुणावला.

त्याने राहूमध्ये सोनवणे गटाला आजपर्यंत थेट कोणीच नडण्याची हिंमत केली नव्हती ती संतोषने लोंढेनी पुरवलेली रसद असल्यामुळे केली आणि राहू गावाच्या मुख्य चौकात वाद झाला तो इतका विकोपाला गेला की संतोष जगतापला गोळीबार करावा लागला. यात संतोष जगतापचा सख्खा भाऊ समीर जगतापचा सख्खा मावस साडू आणि संतोष जगतापचा मित्र असलेला गणेश सोनवणे आणि रमेश सोनवणे मारला गेला तर याच गोळीबारात उमेश सोनवणेला देखील एक गोळी लागून तो जखमी झाला.

नवणे कुटुंबबरोबर कोणाचीच दोन हात करण्याची तयारी नसताना गावात एकच घर असणाऱ्या जगताप कुटुंबाने सोनवणे कुटुंबातील दोन जणांचा बळी घेतला होता राहू बेट आणि पंचक्रोशी या गोळीबाराने हादरून गेली होती

पुढे अप्पा लोंढेनी संतोष जगतापला जामिनावर बाहेर काढला आणि काळे धंदे करण्यासाठी त्याचा वापर सुरूच ठेवला. अप्पा लोंढेचा खून झाल्यानंतर लोंढे गॅंग संतोष चालवू लागला संतोष जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने लोंढे गॅंगची पोर वापरत दौंड तालुक्यातील काही वाळू लिलाव पुन्हा घेतले त्याची मजल वाढतच चालली होती.

दुःख उमेशला शांत बसू देत नव्हते

डोक्यात भाईगिरी करण्याचे स्वप्न असलेली पोर त्याच्याकडे आकर्षित होत होती. परंतु आपला सख्खा भाऊ रमेश आणि मोठा आधार असणारा गणेश सोनवणे गेल्याचे दुःख उमेशला शांत बसू देत नव्हते. त्यांच्या हत्याच्या बदल्याची आग उमेशला शांत झोप येऊ देत नव्हती. त्याच वेळी देलवडी गावात वाळू उपसा करण्यावरून स्वप्नील शेलार आणि संतोष याचा वाद झाला. संतोषने स्वप्नील शेलारला बळाच्या जोरावर मारहाण केली.

ही माहिती मिळताच दुष्मन का दुष्मन दोस्त होता है या म्हणीप्रमाणे उमेशने स्वप्नीलला गाठलं आणि संतोषचा काटा काढण्याची योजना आखली. राहू गोळीबार प्रकरणातील न्यायालयीन कामकाजासाठी संतोष जगताप बारामतीवरून येत असताना उमेश स्वप्नील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोषला उडवण्याचा प्लॅन आखला. रोटी घाटात आल्यानंतर चलाख संतोषच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने पोलिसांना कळवले आणि स्वप्नील आणि उमेशचा संतोषचा गेम करण्याचा प्लॅन फसला.

उमेशपेक्षा स्वप्नील किती खतरनाक आहे याचा अंदाज संतोषला आला आणि पुढे संतोषने योजना आखत स्वप्नीलचा खून केला. त्याचवेळी संतोषने आपल्या आजूबाजूला गुन्हेगारांचा आणि तरुणांचा गराडा वाढवला. खासकरून केडगाव आणि चौफुला भागातील युवकांना आणि किशोरवयीन मुलांना गुंड संतोष हा गुन्हेगाराचा देव वाटू लागला.

गुन्हेगार असणारा संतोष कित्येक जणांसाठी संतोष भाऊ झाला

दहा दहा आलिशान गाड्या घेऊन संतोष जगतापची एन्ट्री होऊ लागली. गुंड आणि गुन्हेगार असणारा संतोष कित्येक जणांसाठी संतोष भाऊ झाला तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्याची हजेरी आकर्षणाचा विषय बनली. सोशल मीडियावर तो किंग भाई या नावाने झळकू लागला आणि हीच गोष्ट उमेशला खटकू लागली.

आपल्या भावाचा मारेकरी इतक्या राजरोसपणे फिरतोय आणि आपण काहीच करू शकत नाही ही बदल्याची भावना त्याच्या मनात घर करून राहिली आणि संतोषला मारण्याचा कट शिजला आणि पहिल्यांदा फसलेला प्रयत्न परत फसू नये याची पुरेपूर काळजी उमेश आणि त्याच्या साथीदारांनी घेतली. उरुळी कांचनमध्ये गोळीबार करत संतोष जगतापचा खून झाला.

खुनाचा बदला घेतला असला तरी यापुढे उमेश सोनवणेला गुंड म्हणून जगावं लागणार

उमेशनी आपल्या भावांच्या खुनाचा बदला घेतला असला तरी यापुढे उमेश सोनवणेला गुंड म्हणून जगावं लागणार आहे हे त्याच्या कदाचित लक्षात आलं नसावं. सरळ आयुष्य जगण्यापेक्षा गुन्हेगार म्हणून जगणं म्हणजे सशा सारख जीवन जगणे जे संतोषने अनुभवलं ते उमेशला जगावं लागणार आहे. तोंडावर मिळणारी इज्जतीपेक्षा मागे होणारी चर्चा किती भयावह असते हे गुन्हेगारांना नाही तर त्यांच्या कुटूंबाला सोसावी लागते हे सर्वांना माहीत आहे.

संतोष जगतापची हत्या म्हणजे दौंड तालुक्यातील भाईगिरीला लगाम अस वाटतं असताना यातील आरोपी दौंड तालुक्यातील असल्याने गुन्हेगारी वाढणार की संपणार हे आता येणारा काळ ठरवणार आहे, पण गणेश सोनवणे, रमेश सोनवणे, स्वप्नील शेलार आणि संतोष जगताप यांची हत्या करणारे आता पूर्वी सारखं सर्वसामान्य जीवन जगू शकत नाहीत.

सधन आणि सरळ कुटूंब म्हणून कोणीही यांच्या कुटूंबाकडे पाहणार नाही. यांच्याबद्दल कसलीही सहानुभूती कोणालाच वाटणार नाही हे गुन्हेगार आणि भाईगिरीची स्वप्न पडत असलेल्यांनी लक्षात घेतले पाहिजे एवढंच.

हे ही वाचलं का?

Back to top button