कोल्हापूर : शिरगावात रानडुक्करांकडून मका पीक जमीनदोस्त | पुढारी

कोल्हापूर : शिरगावात रानडुक्करांकडून मका पीक जमीनदोस्त

विशाळगड, पुढारी वृत्तसेवा : शिरगाव (ता. शाहूवाडी) येथील कटकीचा माळ शिवारात बालदास महाराज मठानजीक रस्त्याजवळ रानडुकरांचा गेल्या काही दिवसांपासून धुडगूस सुरु आहे. शेतकरी शालाबाई चंद्रकांत यादव यांच्या शेतीतील रानडुकरांनी धुडगूस घालून मका पिकांची नासाडी केली. यामध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी. तसेच रानडुकारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

उन्हाळ्यामुळे सध्या पाण्याचे स्रोत कमी झाले आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात वन्यप्राणी आपला आधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. रानडुक्करे उभ्या पिकांत घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सध्या रब्बीचे पिके बहरात आणि काही काढणीस आली आहेत. कटकीचा माळ शिवारात शालाबाई यादव यांनी   २० गुंठे क्षेत्रात मका पिकाची लागवड केली होती. मात्र, मका पीक बहरात असताना रानडुकरांनी चार गुंठे क्षेत्रात पिकाची नासधूस केली आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे. वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हातातोंडाशी आलेल्या घासाची रानडुक्कराकडून मोठी नासाडी झाली आहे. शेतात पीक राखणीस जाण्याचीही भीती वाटत आहे. नुकसानीत मोठा आर्थिक फटका बसला आहे. वनविभागाने पंचनामा करून भरपाई देऊन दिलासा द्यावा. अशी आमची विनंती आहे.
शालाबाई यादव, नुकसानग्रस्त, शिरगाव

हेही वाचा : 

Back to top button