पुणे : संतोष जगताप च्या हत्येनंतर तरी दौंड तालुक्यातील भाईगिरी संपणार ? | पुढारी

पुणे : संतोष जगताप च्या हत्येनंतर तरी दौंड तालुक्यातील भाईगिरी संपणार ?

दीपक देशमुख ; यवत

शुक्रवारी उरुळी कांचन (ता. हवेली जि.पुणे) येथील चौकात भरदुपारी राहू गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष संपत जगताप याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या नंतर आता तरी दौंड (जि.पुणे) तालुक्यातील भाईगिरी संपणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाळू उपसा वादातून हत्याकांड

26 नोव्हेंबर 2011 साली संतोष जगताप याने राहू (ता.दौंड जि.पुणे) मधील मुख्य चौकात गोळीबार करत गणेश सोनवणे व रमेश सोनवणे यांची हत्या केली होती. ‘काळ सोन’ अशी ओळख असणाऱ्या वाळू उपश्या च्या वादातून हे हत्याकांड घडलं होत.

संतोष जगताप याने केलेल्या गोळीबारात त्याचा जवळचा नातेवाईक गणेश सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. या नंतर सोनवणे आणि जगताप या नातेवाईक असणाऱ्या कुटुंबात कायमच वैरत्व आलं. एकेकाळी शांत असणारा राहू बेट परिसर या गोळीबारा नंतर अचानक दणाणून गेला.

काही दिवसांतच संतोष जगतापला जामिनावर बाहेर काढण्यात हवेली, दौंड तालुक्यात कमालीची दहशत असणारा तत्कालीन नामचीन गुंड अप्पा लोंढेला यश आलं.

जामिनावर बाहेर आल्यानंतर लोंढे याने केलेले उपकार फेडण्यासाठी एका सधन कुटूंबातील संतोष जगताप हा कायमच लोंढे याच्याशी जवळीक करून राहू लागला. तत्पूर्वी देखील काही काळ संतोष जगताप याचा वाळू उपश्या मुळे लोंढेशी संबंध आलेला होताच.
परंतु एकेकाळी कोल्हापूरची लाल माती हातात घेऊन कुस्ती करणारा संतोष जगतापने मात्र गावाकडे आल्यानंतर हातात पिस्तुल घेऊन त्याने स्वतः चे हात रक्तरंजित करून घेतले होते.

अप्पा लोंढे टोळीचा संतोष जगतापला आसरा

सोनवणे परिवारातील खुनानंतर अप्पा लोंढे टोळीने संतोष जगताप ला आसरा दिल्याने त्याला त्याच्याबरोबर काम करणे भागच होते. 28 मे 2015 रोजी अप्पा लोंढे याचा देखील उरुळी कांचनला पहाटे च्या सुमारास निर्घृणपणे खून करण्यात आला. लोंढे च्या खुनानंतर संपूर्ण टोळीची जबाबदारी संतोष जगताप याच्या खांद्यावर आली होती.

‘आपण यातून बाहेर पडलं पाहिजे’ असं संतोष जगताप बऱ्याच वेळा त्याच्या जवळच्या लोकांना बोलून दाखवत होता. परंतु त्याचे परतीचे सर्व मार्ग बंद झाले होते.

2015 नंतर हवेली आणि दौंड तालुक्यातील वाळू चोरी करणारे, जमिनीचे वाद निर्माण करणारे हळूहळू जगताप च्या भोवती जमा झाले आणि गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा त्याचा मार्गच बंद झाला.

संतोष जगतापला यापूर्वी ही एकदा मारण्याचा कट

संतोष जगतापला यापूर्वी ही एकदा मारण्याचा कट रचण्यात आला. परंतु यवतचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी मोठ्या शिताफीने या कटातील आरोपी स्वप्निल शेलार व त्याच्या इतर साथीदारांना पकडले आणि मोठा अनर्थ टळला. त्यानंतर काही दिवसांत म्हणजेच 5 ऑगस्ट 2018 रोजी स्वप्नील शेलार याचा देखील खून करण्यात आला. या खुनात संतोष जगताप याचा हात असल्याची फिर्याद शेलार याच्या कुटूंबियांनी यवत पोलिसात दिली होती. यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर मात्र संतोष जगताप कायमच गॅंग च्या आणि अंगरक्षक च्या गराड्यात राहू लागला.

युवा वर्ग मोठ्या प्रमाणात संतोष जगतापकडे आकर्षित

त्याच्या भोवती असणारी गॅंग पाहून दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील भाईगिरी करण्याचे खूळ डोक्यात असणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात संतोष जगतापकडे आकर्षिला गेला. अशा लोकांना जगताप याने मदत केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतच चालला होता.
राहु गोळीबार नंतर संतोष जगताप याने या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचीत शुक्रवारी घडलेली घटना घडली नसती अशी चर्चा दौंड तालुक्यात होती. परंतु भाईगिरी करण्याच्या नादात शेवटी संतोष जगतापला आपला जीव गमवावा लागला.
त्यामुळे यापुढे तरी संतोष जगतापचे हत्या प्रकरण डोळ्यापुढे ठेवून दौंड तालुक्यातील युवकांनी भाईगिरीचे खुळ डोक्यातून काढून टाकण्याची गरज आहे.

Back to top button