prabhakar jog : ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग निधन

prabhakar jog : ज्येष्ठ व्हायोलिन वादक प्रभाकर जोग निधन

ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक प्रभाकर जोग (वय 89) (prabhakar jog)  यांचे निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी व्हायोलिन वादक म्हणून कारकीर्द गाजवली. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतासोबत भावगीताच्या दुनियेतही त्यांनी मोठे योगदान दिले.

प्रभाकर जोग यांचा जन्म २५ डिसेंबर १९३२ मध्ये झाला. प्रभाकर जोग यांचे वडील साखर कारखान्यांच्या तंत्रज्ञानातील जाणकार होते. आई-वडिलांपैकी कोणी कलेच्या प्रांतात नव्हते, मात्र वडिलांना संगीत नाटकांची पहिल्यापासून आवड होती.

prabhakar jog : वडिलांचा वारसा जोग यांच्यात उतरला

पुण्याजवळच्या मांजरा फार्म येथे उमेदवारी करीत असताना बालगंधर्व यांचे नाटक पुण्यात आले की, वडील सायकलवरून बारा किलोमीटरची रपेट करून पुण्यात येत असत, रात्रभर नाटक पाहून, परतीची सायकलवारी करून पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर हजर रहात. संगीतकलेची ही आवड प्रभाकर जोग यांच्यातही उतरली. त्यांनी गजाननराव जोशी आणि नाराणराव मारुलीकर यांच्याकडून वयाच्या ५ व्या वर्षापासून गायन शिकायला सुरुवात केली.

प्रभाकर जोग यांची मोठ्या आकारमानाच्या व्हायोलिनशी चाललेली झटापट पाहून त्यांच्या आजीने त्याना अडीचशे रुपयांचे एक छोटे व्हायोलिन आणून दिले. प्रभाकर जोग (prabhakar jog) या वाद्यावर हळूहळू प्रभुत्व मिळवत गेले. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग हे आकाशवाणीवर व्हायोलिनवादक म्हणून नोकरी करत आणि घरी व्हायोलिनचे वर्ग घेत..प्रभाकर जोग आसपास रेंगाळून संगीताचा आस्वाद घेतच मोठे झाले.

वयाच्या १२ व्या वर्षापासून व्हायोलीन वादनाला सुरूवात

वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाड्यांमधून त्यांनी सव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानात भरलेल्या स्नेहसंमेलनात व्हायोलिन वाजवत असताना मदानापलीकडे राहणाऱ्या सुधीर फडके यांनी ते ऐकले आणि प्रभाकर जोग यांना भेटायला बोलावले. पुढे ते संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांचे सहाय्यक झाले. गीतरामायणाच्या सुमारे ५०० कार्यक्रमांना प्रभाकर जोग यांची साथ होती.

स्नेहल भाटकर यांच्याकडे जोग यांनी 'गुरुदेवदत्त' या १९५१ च्या चित्रपटात व्हायोलिन वादन केले. स्वरलिपी लेखनकलेत पारंगत असलेले प्रभाकर जोग त्यानंतर संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, वसंत प्रभू, राम कदम आणि यशवंत देव यांच्याबरोबर काम करू लागले. १९५२ साली प्रभाकर जोग हिंदी चित्रपसृष्टीत साँग व्हायोलिनिस्ट् म्हणून दाखल झाले.

मोठ्या दिग्दर्शकांकडून बोलवणे

रोशन, मदनमोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीत दिग्दर्शकांकडून त्यांना बोलावणी येऊ लागली. प्रभाकर जोग यांनी मराठी चित्रपट, गामोफोन कंपन्या, आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्यासाठी संगीताच्या सुरावटी रचल्या आहेत. प्रभाकर जोगांच्या व्हायोलिन वादनातून जणू शब्द ऐकू येतात, त्यामुळे त्यांचे व्हायोलिन 'गाणारे व्हायोलिन' म्हणून ओळखले जात असे. प्रभाकर जोग यांनी गाण्याला भावप्रधान करताना व्हायोलिनचा सुंदर वापर केला.

सुरुवातीच्या काळात त्यांनी व्हायोलिनवादनाचे लहान-मोठे कार्यक्रम केले. पुढे संगीतकार श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, वसंत पवार, राम कदम, वसंत प्रभू या दिग्गज संगीतकारांना साथ केली. 'लपविलास तू हिरवा चाफा' या गीतापासून जोग हे स्वतंत्र गीतकार म्हणून महाराष्ट्राला परिचित झाले. 'जावई माझा भला' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. त्यांनी एकूण २२ चित्रपटांना संगीत दिले.

सुधीर फडके यांच्या ५०० कार्यक्रमांना व्हायोलिनचे सूर

गायक, संगीतकार सुधीर फडके यांच्या गीतरामायणाच्या ५०० पेक्षा अधिक कार्यक्रमांना व्हायोलिनचे सूर दिले. 'गाणारे व्हायोलिन' आणि 'गाता रहे मेरा व्हायोलिन' या त्यांच्या व्हायोलिन गीतांच्या व्हिसीडी रसिकांच्या पसंतीस उतरल्या. 'स्वर आले दुरूनी','तेच स्वप्न लोचनात','बाजार फुलांचा भरला','हे चांदणे फुलांनी','सोनियाचा पाळणा', 'सत्यात नाही आले स्वप्नात येऊ का','आला वसंत ऋतू आला' ही जोग यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली.

हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनमोहन, एस. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, शंकर जयकिशन, खय्याम, ओ.पी. नय्यर, उषा खन्ना, जयदेव, रवींद्र जैन या संगीतकारांसोबतही त्यांनी काम केले. व्हायोलिन वादन आणि संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना वसुंधरा पंडित, लता मंगेशकर, सूरसिंगार, चित्रकवी,गदिमा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news