रोहित्रांच्या उघड्या फ्यूज पेट्या धोकादायक; आंबेगावच्या पूर्वभागातील स्थिती | पुढारी

रोहित्रांच्या उघड्या फ्यूज पेट्या धोकादायक; आंबेगावच्या पूर्वभागातील स्थिती

लोणी-धामणी(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, खडकवाडी, जारकरवाडी, निरगुडसर व इतर गावातील वाड्या-वस्त्यांवरील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रोहित्रांच्या फ्यूज पेट्या सताड उघड्या असल्याने अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या रोहित्रांच्या फ्यूज पेट्यांमधील फ्यूज फुटल्याने तारांचा आधार घेऊनच या रोहित्रावरून इतरत्र वीज गेली आहे. बऱ्याच वेळा या रोहित्रांवर विजेचा दाब वाढला की, रोहित्रांच्या उघड्या फ्यूज पेट्यांमध्ये विजेच्या मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडतात, त्यामुळे या फ्यूज पेट्यांमधील जीर्ण झालेले फ्यूज बदलण्याची गरज आहे, तसेच फ्यूज पेट्यांना कायमस्वरूपी झाकणांची सोय करणे गरजेचे आहे.

या परिसरातील महावितरणचे जवळ-जवळ सर्वच कर्मचारी बाहेरगावी राहत असल्याने शिवाय ते ठेकेदाराच्या माध्यमातून काम करत असल्याने ते कुणाला जुमानत नाहीत, शिवाय ग्राहकांशी उद्धट वागतात. रोहित्राच्या अनेक फ्यूज पेट्या या वेगवेगळ्या वेलींनी वेढल्याने आणखी धोका वाढला आहे. त्यासाठी महावितरणने अशा सताड उघड्या असणाऱ्या फ्यूज पेट्यांना ताबडतोब झाकणे घालून व्यवस्थित फ्यूज बसवावेत व फ्यूज पेट्यांवरील वाढलेल्या वेली त्वरित काढाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button