सांगली: विटा येथील पोल्ट्री १५ दिवसांत बंद करा: प्रांताधिकारी भोर | पुढारी

सांगली: विटा येथील पोल्ट्री १५ दिवसांत बंद करा: प्रांताधिकारी भोर

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यातील शिवाजीनगर येथील रहिवाशी भागातील पोल्ट्रया १५ दिवसांत बंद करा, असे लेखी आदेश विटा पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी संतोष भोर यांनी दिले आहेत. शिवाय कारवाई ढिलाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.

विट्यातील शिवाजीनगर, शाहूनगर आणि सुतारकी परिसरात रहिवासी क्षेत्रात अनेक पोल्ट्री आहेत. या पोल्ट्रयांच्या दुर्गंधीचा आणि माशांचा प्रचंड मोठा त्रास तेथील ३०० ते ४०० कुटुंबांना गेली अनेक वर्षे सहन करावा लागत आहे. याबाबत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल शितोळे यांनी विटा पालिका, जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधितांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. तसेच या मागणीसाठी ऐन प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी आमदार अनिलराव बाबर यांनी भेट दिली होती.

तसेच विटा पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी भोर यांच्याकडे विटा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दप्तर दिरंगाई केल्याचे तक्रार शितोळे यांनी केली होती. यावर आता सुनावणी होऊन येत्या १५ दिवसात पोल्ट्री बंद करण्याचे आदेश विटा पालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच या कारवाईत ढिलाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, असे आदेशही प्रांताधिकारी भोर यांनी दिले आहेत. त्यामुळे आत्ता तरी विटा पालिका रहिवाशी भागातील पोल्ट्री बंद होतील, अशी अपेक्षा शितोळे यांच्यासह संबंधित भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा 

Back to top button