सांगलीत समुद्र आणायचा होता त्याचं काय झालं? | पुढारी

सांगलीत समुद्र आणायचा होता त्याचं काय झालं?

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीला समुद्र आणायचा प्रस्ताव चार वर्षे झाली पडून आहे. लोकांची काळजी असती तर हा प्रस्ताव मंजूर करून आत्तापर्यंत समुद्र आला असता आणि लोकांना महापुराची सवय झाली असती. लोक मेल्यावर प्रशासन जागं होणार का, असा घणाघाती सवाल करत महापालिकेच्या सदस्यांनी आज प्रशासनाला धारेवर धरलं. निमित्त होतं महापालिकेच्या अभिरुप महासभेचं.

महापालिकेच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी अभिरुप महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या महासभेत प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांच्या तर नगरसेवक अधिकार्‍यांच्या भूमिकेत होते. अधिकार्‍यांनी या भूमिकेचा फायदा घेत आज नगरसेवकांच्या छुप्या कारनाम्यांची, नॉन सिरियसपणाची मनमुराद खिल्ली उडवली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आयुक्त, आयुक्त सुनील पवार महापौर, अनारकली कुरणे नगरसचिवांच्या भूमिकेत होते.

भटक्या कुत्र्यांच्या पकड मोहिमेबाबत संतप्त झालेल्या सदस्यांनी महासभेत गदारोळ घातला. भटक्या कुत्र्यांमुळे चोर्‍यांचे प्रमाण एकदम कमी झाले आहे. कुत्र्यांच्या भीतीने चोरपण रात्री फिरत नाहीत. चोर्‍यांचे प्रमाण एकदम कमी झाले आहे, याबाबत उपायुक्तांनी खुलासा द्यावा, असा जाब सदस्यांनी विचारला. आफ्रिकेवरून चित्ते आणायचा विषयही यानिमित्तानं पटलावर आला. आफ्रिकेेवरून चित्ते आणले तर आमच्या कुत्र्यांचे काय? चित्त्यांपासून फायदा काय, असे सवालावर सवाल विचारण्यात आले. यावर चित्त्यांची पैदास वाढवून ते परत परदेशात विकून त्यातून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचा खुलासा महापौरांनी केला.

चित्त्यांवर इतका खर्च करण्यापेक्षा आपल्याच मोकाट कुत्र्यांना चित्त्यांची कपडे घालावी आणि ती दत्तक द्यावीत, अशी सूचना मांडण्यात आली. मिरजेला तीन, सांगलीला दोन तर कुपवाडला एक चित्ता देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या चित्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती नेमली जाईल. ही समिती रात्रभर चित्त्यांवर लक्ष ठेऊन सकाळी अहवाल देईल, अशी माहिती महापौरांनी दिली.

चंद्रावर जाण्यासाठी अवकाश स्थळ कोेठे उभे करायचे, यावरही महासभेत वादंग झाले. कुपवाड हे चंद्राला जवळ असल्याने ते तिथेच करावे, अशी मागणी सदस्यांनी केली, तर हे स्थळ आयुक्तांच्या बंगल्याजवळ केले तर आयुक्तांचे लक्ष राहिल शिवाय त्याच्या किल्ल्या डॉ. आंबोळे यांच्याकडे दिल्यास स्थळ सुरक्षित राहिल, अशी सूचना मांडण्यात आली. त्याला मंजुरी मिळाली.

या महासभेत आयुक्तांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. यावर सदस्य संतापले होते. प्रत्येक वेळी महापौरच बोलतात, त्यांनी सांगितल्यानंतर आयुक्त बोलतील, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मिसळ पावावर ताव मारून महासभा संपन्न झाली.

Back to top button