मर्सिडीजने दोघांना उडविले, चालक महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला | पुढारी

मर्सिडीजने दोघांना उडविले, चालक महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे मध्यवर्ती रेल्वे स्थानक परिसरात रामझुल्यावर २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव मर्सिडीज कारने दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली होती. अनेक दिवस आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न झाला मात्र, प्रत्यक्षदर्शी घटनाक्रम पुढे आला. पुणे येथील अपघातानंतर नागपुरातील हा हिट अँड रन अपघात चर्चेत आला. अखेर याप्रकरणी आरोपी रितिका उर्फ ​​रितू मालूचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला. 32 वर्षीय मोहम्मद अतिफ आणि 34 वर्षीय मोहम्मद हुसैन हे दुचाकीस्वार राम झुल्यावरून जात होते. एका मर्सिडीजने त्यांना जोरदार धडक दिली.

रात्री दीड वाजता हा अपघात झाला. या अपघातात मोहम्मद हुसैन हा जागीच ठार झाला. तर मोहम्मद अतिफ याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. रितिका मालू आणि माधुरी सारडा या दोघी यावेळी मर्सिडीजमध्ये होत्या. रितीका ही गाडी चालवत होती. यावेळी या दोघींनी मद्यपान केल्याचा आरोप आहे. वैद्यकीय तपासणीतही ही बाब स्पष्ट झाली.

या दोन्ही महिला व्यावसायिक, उच्चभ्रू कुटुंबातील आहे. अपघात झाल्यानंतर त्यांचे पती घटनास्थळी आले. पोलीसही तिथे हजर होते. त्यावेळी त्यांच्या समोरून त्या दोनही महिलांनी पळ काढला असा आरोप मृतांच्या नातेवाईकांचा आहे. एकाचा मृत्यू झाला होता तर एक जण मृत्यूशी झुंज देत असताना महिला तिथून पळून गेल्या. विशेष म्हणजे त्यांना जामीनही मिळाला. दरम्यान,त्यांच्या रक्तात दारूचे प्रमाण आढळले. पोलिसांनी या दोघींविरोधात सुरूवातीला गुन्हा दाखल केला होता. यांचा जामीन रद्द होण्यासाठी तारीख पे तारीख सुरू होती. मात्र आज न्यायालयाने आरोपी रितिका मालूचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला.

Back to top button