सातारा : विहिरीजवळील फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोघा भावांचा मृत्यू | पुढारी

सातारा : विहिरीजवळील फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोघा भावांचा मृत्यू

कराड; पुढारी वृत्तसेवा : विहिरीनजीक असलेल्या फ्युज बॉक्सचा शॉक लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील बाबरमाची (सदाशिवगड) परिसरात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले होते.

तुकाराम सदाशिव खोचरे (वय ५५) व शहाजी सदाशिव खोचरे (वय ५०) अशी त्या दुर्दैवी भावांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बाबरमाची – सदाशिवगड येथील तुकाराम खोचरे आणि शहाजी खोचरे या सख्ख्या भावांची गावातील भटकी नावाच्या शिवारात शेत जमीन आहे. या शेतीनजीक त्यांची विहिर असून विहिरीजवळ फ्युज बॉक्स आहे. त्या फ्युज बॉक्समधून विहिरीला जोडलेल्या शेती पंपास विद्युत पुरवठा करण्यात आला आहे.

शेतात काम असल्यामुळे तुकाराम खोचरे व शहाजी खोचरे हे दोघेजण शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी बाहेर पडले. त्यानंतर दिवसभर ते घरी परत आले नाहीत. सायंकाळपर्यंत दोघेही घरी न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनाही फोन लागत असूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सायंकाळी तुकाराम खोचरे यांचा मुलगा शेताकडे गेला. त्यावेळी तुकाराम खोचरे व शहाजी खोचरे हे दोघेजण विहिरीपासून काही अंतरावर असलेल्या फ्युज बॉक्सनजीक मृतावस्थेत पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

Back to top button