सांगली : अपेक्षा आणि वास्तवाचा बसेना मेळ | पुढारी

सांगली : अपेक्षा आणि वास्तवाचा बसेना मेळ

सांगली; नंदू गुरव :  मला नोकरी आहे. दुकान आहे. स्वत:चा फ्लॅट आहे. पाणस्थळ शेती आहे. चार स्थळे आली होती; पण मुलीकडची मंडळी मुलाला पुण्या-मुंबईत नोकरी पाहिजे. पॅकेज चांगलं पाहिजे. पदवीधर स्थळ बघायचंसुध्दा नाही. इंजिनिअरलाच मुलगी द्यायची आहे. गावाकडं चार- पाच एकर शेती ती पण मुलाच्या नावावर पाहिजे, असल्या जगावेगळ्या अपेक्षा सांगताहेत. आता तर लग्नच नको वाटायला लागलंय.. ही घुसमट आहे समृध्द घरातल्या निर्व्यसनी, कमावत्या मुलांची मुलीकडच्या मंडळींच्या अवास्तव अपेक्षा आणि वास्तवाचा मेळ बसत नसल्यानं सार्‍याच जातींतील समाजापुढं लग्नाचा पेच गंभीर बनला आहे.

नोकरी पाहिजे, शेती पण पाहिजे

मुलीकडच्या मंडळींच्या स्थळाबाबतच्या अपेक्षांनी मुलांकडची मंडळी अक्षरश: वैतागून गेल्याचं दिसत आहे. अगदी दहावी-बारावी पास झालेल्या आणि घरकाम करणार्‍या मुलींकडच्या अपेक्षाही इतक्या मोठ्या आहेत की, त्या वास्तवात येणं अशक्य आहे, अशी भावना मुलाकडची मंडळी व्यक्त करीत आहेत.

मुलाला सरकारी नोकरी हवी, तो इंजिनिअर असावा, त्याचा पुण्यात फ्लॅट हवा, त्याला चांगलं पॅकेज हवं इथंपर्यंत ठिक; पण तो एकुलता एकच असावा, लग्नानंतर त्यानं पुण्यातच सेटल व्हावं, आमची मुलगी गावाकडं राहणार नाही, मुलाला गावाकडं चांगलं घर पाहिजे, चार-पाच एकर तरी शेती पाहिजे, ती पाणस्थळ पाहिजेच शिवाय ती मुलाच्या नावावरच असली पाहिजे या अपेक्षा अवास्तव नाहीत का, असा सवाल मुलाकडची मंडळी करीत आहेत. यावर नोकरीचं काय सांगावं? ती गेली तर स्थावर मालमत्ता काही नको का? म्हणून नोकरी असली, तरी शेती पाहिजेच ही अपेक्षा चुकीची आहे का, असा सवाल मुलीकडची मंडळी विचारत आहेत. मुलीला इतकं शिकवलं, तिनंही शिकून चांगला जॉब मिळवला. मग, आता तिनंही तिच्या इतक्याच सरस जोडीदाराची अपेक्षा केली, सासरबद्दल, आपल्या भावी संसाराबद्दल काही अपेक्षा ठेवल्या, तर त्यात चूक ती काय, असा त्यांचा सवाल आहे. ज्यात तथ्यही आहे. पण, वयाचा आणि अपेक्षांचा ताळमेळ बसेना आणि मग मुलीसोबत तिच्या कुटुंबाचीही काळजीनं झोप उडाली आहे.

मुलगी पाहिजे.. कसलीही चालेल..

या अपेक्षांनी मुलांना पुरतं हैराण केलं आहे. गावाकडं शेती आहे. गावाकडंच, जवळच्या शहरात चार आकडी पगाराची नोकरी आहे. कसलं व्यसन नाही. आजार नाही. इमेज चांगली आहे, तरीही लग्नाला होकार येत नाही. फक्त लग्नासाठी गाव, शेती, आई-वडील सारं सोडून पुण्या- मुंबईला जायला मन तयार होत नाही. वय वाढत चाललं आहे आणि लग्न तर लांबत चाललं आहे या मनःस्थितीत मुलांची मानसिकता ढासळत चालली आहे. न्युनगंड आला आहे. आमची कसलीही अपेक्षा नाही, कसलीही मुलगी चालेल, अगदी अंतरजातीयसुद्धा चालेल. एका पै ची अपेक्षा नाही, सारा खर्च आम्ही करू; पण मुलाचं लग्न झालं पाहिजे इतकी अगतिकता मुलांकडच्या मंडळींना आली आहे; पण सारं कबूल असतानाही स्थळ काही येत नाही. अपेक्षा आणि वास्तवाचा ताळमेळ बसवता बसवता आणि अपेक्षित स्थळ शोधता शोधता मुला-मुलींचं वय मात्र वाढत चाललं आहे.

अपेक्षा नेमक्या कोणाच्या?

सांगलीतील मराठा समाज संस्था, मुरघाराजेंद्र वीरशैव लिंगायत बोर्डिर्ंग संचलित, दिगंबर जैन बोर्डिंग संचलित वधू-वर सुचक मंडळाकडे सातत्याने नोंदणी सुरूच असते. त्यातही मुलींपेक्षा मुलांची नोंदणी जास्त आहे. 38 वर्षे वयाची मुले, मुली लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. इंजिनिअर झालेल्यांची नोंदणी जास्त आहे. घटस्फोटितांचे प्रमाणही जास्त आहे. या संस्थांचे संचालकही मुलींच्या अपेक्षा आणि वास्तवातली परिस्थिती यात खूप फरक असल्याचं सांगतात. मुली ज्या अपेक्षा व्यक्त करतात त्या त्यांच्या स्वत:च्याच असतात की त्यांच्या पालकांच्या असतात, असा कळीचा मुद्दाही ते मांडतात. संसार म्हणजे कुठंतरी तडजोड करायला हवी; पण ती करायची कुणी, इथंच घोडं अडलं असल्याचं ते सांगतात.

Back to top button